चिपळूण/रत्नागिरी (क्राईम रिपोर्टर): रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे गुहागर बायपास रोडवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गाडीला धक्का (Dash) मारल्याचा कांगावा करत, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी एका ५८ वर्षीय कंत्राटदाराला गाडीबाहेर खेचून बेदम मारहाण केली. या मारहाणीत कंत्राटदार गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मारुती चिले (वय ५८, व्यवसाय – कंत्राटदार, रा. पाचाड-चिलेवाडी, ता. चिपळूण) हे गुरुवारी (दि. २८ नोव्हेंबर) रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास आपल्या इनोव्हा क्रिस्टा कारने (क्रमांक MH-08-BE-7891) गुहागर बायपास रोडने घरी परतत होते.
पांडवलेणीच्या पुढील बाजूस असलेल्या वळणावर त्यांच्या कारचा पाठलाग करत एका मोटारसायकलवरून तीन अनोळखी इसम आले. त्यांनी आपली दुचाकी चिले यांच्या इनोव्हा कारच्या पुढे आडवी लावून त्यांना थांबवले. यानंतर एकाने गाडीजवळ येऊन, “आमच्या गाडीला डॅश देऊन तुम्ही पळून जाता काय?” अशी विचारणा केली. चिले यांनी काही समजवण्यापूर्वीच, सोबतच्या इतर दोघांनी “तुम्ही खाली उतरा,” असे म्हणत अरेरावी सुरू केली.
गाडीतून खेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण
अनिल चिले यांनी शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. “जर माझ्या गाडीची डॅश झाली असेल, तर मी नुकसानभरपाई आणि खर्चाचे पैसे देण्यास तयार आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या त्या तिघांनी चिले यांना गाडीतून बळजबरीने बाहेर खेचले. त्यानंतर त्यांना रस्त्यावर पाडून त्यांच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि उजव्या डोळ्याच्या खालील बाजूस लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी अनिल चिले यांनी २९ नोव्हेंबर रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तीन अज्ञात इसमांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२६(२) (अडवणूक करणे), ११५(२) (दुखापत करणे), ११८(१) आणि ३(५) (समान उद्देशाने गुन्हेगारी कृत्य) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २७२/२०२५) दाखल केला आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे बायपास रोडवरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 01/Dec/2025














