चिपळूण (वार्ताहर): चिपळूण शहरातील मार्कंडी, स्वामी समर्थ मठासमोर राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शुभम रवींद्र सावर्डेकर (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना शुक्रवारी, दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या पूर्वी घडली.
नेमकी घटना काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम रवींद्र सावर्डेकर हा मार्कंडी येथील स्वामी समर्थ मठासमोरील आपल्या राहत्या घरात होता. शुक्रवारी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास, शुभमचे चुलते निलेश वसंत सावर्डेकर यांना शुभम हॉलच्या बाजूला असलेल्या रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने सिलिंग फॅन लावण्याच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला होता.
रुग्णालयात नेले असता मृत घोषित ही धक्कादायक घटना निदर्शनास येताच नातेवाईकांनी तात्काळ त्याला खाली उतरवून उपचारासाठी चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूचे कारण ‘गळफास लागल्यामुळे गुदमरून मृत्यू’ (Asphyxia death due to Hanging) असे देण्यात आले आहे.
पोलिसात नोंद याप्रकरणी मयताचे चुलते निलेश वसंत सावर्डेकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक (ADR) ६६/२०२५ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद केली आहे. इतक्या तरुण वयात शुभमने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 01/Dec/2025














