रत्नागिरी (प्रतिनिधी): शहरातील नाचणे परिसरात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) गोडावूनला रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले आणि पाणीपुरवठा योजनांसाठी साठवून ठेवलेले लाखो रुपयांचे एचडीपी (HDPE) पाईप्स जळून खाक झाले. या आगीमुळे विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वाळलेल्या गवताने केला घात मिळालेल्या माहितीनुसार, नाचणे येथील हवामान केंद्रासमोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे हे गोडावून आहे. रविवारी सकाळी गोडावूनच्या बाहेरील बाजूस असलेल्या वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. यावेळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आगीने पेट घेतला आणि ती वेगाने गोडावूनच्या आवारात पसरली. गोडावूनमध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी वापरले जाणारे मोठे एचडीपी पाईप्स साठवून ठेवले होते. हे पाईप्स अत्यंत ज्वलनशील असल्याने आगीचा भडका उडाला. आगीचे आणि धुराचे प्रचंड लोट आकाशात उसळल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती.
प्रचार सोडून उमेदवार धावले मदतीला
सध्या रत्नागिरीत निवडणुकीची धामधूम सुरु आहे. ही घटना घडली तेव्हा प्रभाग क्रमांक ५ मधील महायुतीचे उमेदवार सौरभ मलुष्टे हे आपल्या प्रभागात प्रचारात व्यस्त होते. मात्र, आगीची बातमी समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला प्रचार अर्ध्यावर थांबवला आणि कार्यकर्त्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदतकार्य वेगाने सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे स्थानिक नागरिकांमधून कौतुक होत आहे.
कार्यालयाचेही नुकसान
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत लाखो रुपयांचे पाईप्स जळून खाक झाले होते. आगीची तीव्रता इतकी होती की, गोडावूनला लागून असलेल्या प्राधिकरणाच्या कार्यालयालाही त्याची झळ बसली. कार्यालयातील साहित्याचेही यात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 01/Dec/2025














