चिपळुणात संशयित दुचाकीसह बिहारच्या तरुणाला बेड्या! पोलीस हवालदार संदिप माणकेंची सतर्कता; चोरीची गाडी जप्त

चिपळूण (क्राईम रिपोर्टर): रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात पोलिसांनी संशयित वाहनांवर करडी नजर ठेवली असून, रविवारी सकाळी एका मोठ्या कारवाईत संशयास्पद दुचाकीसह एका परप्रांतीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडील गाडीबाबत त्याला कोणतीही समाधानकारक माहिती देता न आल्याने ही गाडी चोरीची असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चिपळूण पोलीस ठाणे हद्दीतील खेडेकर संकुलकडे जाणाऱ्या रोडवर करण्यात आली.

नेमकी घटना काय?

चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप सदाशिव माणके हे रविवारी सकाळी गस्तीवर असताना त्यांना खेडेकर संकुलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम काळ्या रंगाची HERO HONDA CD DAWN (गाडी क्रमांक MH-08-N-7039) घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून गाडीच्या कागदपत्रांबाबत आणि मालकी हक्काबाबत विचारपूस केली.

उडाली भंबेरी, समाधानकारक उत्तर नाही

पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच संबंधित व्यक्तीची भंबेरी उडाली. गाडी कोणाची आहे? ती कुठून आणली? याबाबत त्याला कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे ही गाडी त्याने कोठून तरी लबाडीने किंवा चोरून आणली असल्याची पोलिसांची खात्री पटली. पोलिसांनी तात्काळ गाडी जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपी बिहारचा मूळ रहिवासी

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद जमील मोहम्मद खालीक अंसारी (वय ४०) असे आहे. तो सध्या मुरादपूर मोहल्ला, चिपळूण येथे वास्तव्यास असला तरी मूळचा रामपूर मैयनाथ, पोस्ट ऑफिस श्रीकांत सिमरा, जिल्हा मुजफ्फरपूर, बिहार येथील रहिवासी आहे.

गुन्हा दाखल

पोलीस हवालदार संदिप माणके यांच्या फिर्यादीनुसार, चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी मोहम्मद अंसारी याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ (संशयास्पद मालमत्ता बाळगणे) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २७३/२०२५) दाखल करण्यात आला आहे. चिपळूण पोलीस आता या गाडीचा मूळ मालक कोण आहे आणि आरोपीने ती कोठून चोरली होती, याचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 01/Dec/2025