संविधान हेच लोकशाहीचा पाया’; गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त अभिरूप ग्रंथप्रदर्शन; जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी (शैक्षणिक प्रतिनिधी): रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून एका विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात भारतीय संविधान, भारतीय लोकशाही आणि भारतीय राज्यघटनेवर आधारित विविध दुर्मिळ व महत्त्वपूर्ण राज्यशास्त्रविषयक ग्रंथांचा खजिना वाचकांसाठी खुला करण्यात आला. या प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी श्री. प्रविंद बिरादार यांच्या हस्ते संपन्न झाले.

मान्यवरांची उपस्थिती

या उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आशिष बर्वे, कला शाखा उपप्राचार्या आणि ग्रंथालय समितीच्या समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम आणि विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या. तसेच हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. डी. मधाळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश पाटील, गणित विभागप्रमुख डॉ. दिवाकर करवंजे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे आणि ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

ग्रंथालयाचे वाचकाभिमुख उपक्रम

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी संविधान दिनाचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, “ग्रंथालयात उपलब्ध असलेले समृद्ध ग्रंथवैभव आणि वाचन साहित्य यांचा विद्यार्थी व प्राध्यापकांना परिचय व्हावा, या उद्देशाने ग्रंथालयातर्फे सातत्याने नाविन्यपूर्ण आणि वाचकाभिमुख उपक्रम राबवले जातात.” यावेळी त्यांनी महाविद्यालयात राबवण्यात येणारे वाचन प्रेरक उपक्रम आणि ग्रंथालयाच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला.

विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

दोन दिवस खुले ठेवण्यात आलेल्या या ग्रंथ प्रदर्शनाला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी संविधानाशी संबंधित पुस्तके हाताळत माहिती जाणून घेतली. लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी अशा प्रदर्शनांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 01/Dec/2025