२३ देशांतील स्पर्धकांवर मात; ‘लास्ट टेबल प्रॉडक्शन’च्या तरुणांची आणि बालकलाकारांची गगनभरारी
रत्नागिरी : कोकणातील कलाकारांमध्ये अफाट प्रतिभा आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. रत्नागिरीचा झेंडा आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर डौलाने फडकला आहे. जगातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘आयएफपी शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय स्पर्धेत’ (IFP Short Film International Challenge) रत्नागिरीतील ‘लास्ट टेबल प्रॉडक्शन’च्या ‘डुन्नु’ (Dunnu) या शॉर्ट फिल्मने सिल्व्हर मेडल (रौप्य पदक) पटकावत बाजी मारली आहे. रत्नागिरीतील बालकलाकार आणि तरुण दिग्दर्शकाने मिळवलेले हे यश जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
काय आहे हे ५० तासांचे चॅलेंज?
‘आयएफपी’ ही आशियातील सर्वात मोठी कंटेंट फेस्टिव्हल स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेचे स्वरूप अत्यंत आव्हानात्मक असते. स्पर्धेचा विषय (Topic) जाहीर झाल्यानंतर अवघ्या ५० तासांच्या आत स्क्रिप्टिंग, शूटिंग, एडिटिंग आणि डबिंग करून पूर्ण चित्रपट सादर करायचा असतो. रत्नागिरीतील तरुणांनी हे ‘मिशन ५० तास’ अत्यंत समर्थपणे पेलले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत जगभरातील २३ देशांतील ३५० शहरांमधून ४० हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्वांवर मात करत ‘डुन्नु’ने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
मेहबूब स्टुडिओमध्ये तारकांच्या उपस्थितीत गौरव
मुंबईतील प्रसिद्ध मेहबूब स्टुडिओ येथे या स्पर्धेचा दिमाखदार बक्षीस वितरण सोहळा पार पडला. बॉलीवूडचे दिग्गज कलाकार अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, नवाजुद्दीन सिद्दिकी, अनन्या पांडे, तसेच नामवंत दिग्दर्शक अनुराग बासू, अनुभव सिन्हा आणि रवी जाधव यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या या शिलेदारांचा गौरव करण्यात आला.
‘डुन्नु’ची स्टारकास्ट आणि टीम ही शॉर्ट फिल्म यशस्वी करण्यात बालकलाकारांचा वाटा मोलाचा आहे.
बालकलाकार: विष्णू आशिष घाणेकर, रियांश चेतन साखरपेकर, गंधार तपन मलुष्टे.
सह-कलाकार: गणेश राऊत, सौ. शमिका आशिष घाणेकर, सुनील बेंडखळे.
पडद्यामागचे खरे हिरो:
लेखन व दिग्दर्शन: सुमित मालप
निर्मिती: अनबॉक्सचे गौरांग आगाशे आणि नंदाई डिजिटल मार्केटिंगचे धिरज पाटकर.
सिनेमॅटोग्राफी: प्रसाद पिलणकर आणि सिद्धराज सावंत.
संकलन (Editing): निखिल पाडावे आणि मयुर दळी.
संवाद: मयुर दळी.
संगीत व गायन: ओंकार बंडबे (म्युझिक अरेंजर: पंकज घाणेकर).
गीतकार (कवयित्री): केतकी ब्रम्हनाळकर.
लाईन प्रोड्युसर: रितीक सनगरे.
रत्नागिरीसारख्या शहरातून येऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर रौप्य पदक जिंकल्याबद्दल ‘डुन्नु’च्या संपूर्ण टीमवर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 01/Dec/2025














