लांजात १४ हजार २३२ मतदार बजावणार मतदान हक्क !

लांजा : लांजा नगर पंचायतीच्या मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. लांजा नगर पंचायत निवडणुकीत एकूण १४ हजार २३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

निवडणुकीसाठी नगरपंचायत हद्दीत एकूण १९ मतदान केंद्रांची उभरणी केली आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी व निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यात २०११च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ हजार २८६ आहे. नगरपंचायतीचे १७ प्रभाग असून या प्रभागातून १७ सदस्य नगरसेवक म्हणून निवडून दिले जाणार आहेत. शहराची निर्धारित मतदार संख्या १४ हजार २३२ असून यात पुरुष मतदार संख्या ७,०८७, तर महिला मतदार संख्या ७,१४५ इतकी आहे. सर्वात जास्त ८ क्रमांकाच्या प्रभागात १ हजार ५४ मतदारसंख्या आहे, तर सर्वात कमी मतदार संख्या प्रभाग ७ मध्ये ६१५ इतकी आहे. शहरात या निवडणूक प्रकियेसाठी १९ मतदान केंद्रे निश्चित झाली असून प्रभाग ११ व प्रभाग १४ या दोन प्रभागांसाठी प्रत्येकी दोन केंद्रे व इतर १५ प्रभागांसाठी १० प्रत्येकी १ केंद्र देण्यात आले आहे. २ डिसेंबर रोजी मतदान सकाळी ७.३० ते सायं ५.३० वाजेपर्यंत, तर मतमोजणी व निकाल जाहीर करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी सकाळी वाजल्यापासून सुरूवात होणार आहे. मतमोजणी लांजा नगरपंचायतीच्या बहुउद्देशीय सभागृहात केली जाणार आहे. दरम्यान, सर्व मतदान केंद्रांची पाहणी प्रशासन स्तरावरून करण्यात आली. त्याठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले असून मतदार प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 02/Dec/2025