रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषद, नगर पंचायतींच्या निवडणूक प्रचारासाठी एक दिवस वाढवून मिळाला, परंतु या निर्वाचन क्षेत्रातील बाईन शॉप, देशी, विदेशी मद्यासह माडी बिक्री करणाऱ्या परवानाधारकांच्या ड्राय डे चा (कोरडा दिवस) एक दिवस कमी झाला नाही. निवडणूक काळात मतदान झाल्यानंतर आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरही मद्यविक्री सुरु करण्याची प्रथा होती. मात्र यावेळी सोमवारपासून सलग तीन संपूर्ण दिवस मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे हे सर्व परवानाधारक हिरमुसले आहेत.
जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड नगर परिषदांसह लांजा, देवरुख, गुहागर नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. मंगळवारी मतदान आणि बुधवारी मतमोजणी होणार आहे. या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे चे आदेश काढले आहेत. मुंबई मद्य निषेध अधिनियम १९४९ चे कलम १४२ अन्वये सलग तीन दिवस म्हणजे मतदानाच्या पूर्वीचा दिवस सोमवारसह मतदान आणि मतमोजणीच्या दिवसासाठी ड्राय डे चा आदेश आहे. त्यामुळे सलग तीन दिवस निवडणूक असलेल्या शहरांमधील मद्य आणि माडी विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश झाले आहेत.
नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा एक दिवस वाढला आहे. ३० नोव्हेंबर ऐवजी १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे. आत्तापर्यंतच्या निवडणूक काळात मतदान झाल्यानंतर आणि निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मद्यविक्री सुरु करण्यास परवानगी होती, परंतु आताच्या निवडणुकींमध्ये संपूर्ण तिन्ही दिवशी मद्यविक्री बंद करण्याचे किंवा ड्राय डे चे आदेश झाले असल्याने मद्यविक्री परवानाधारक होणाऱ्या नुकसानीमुळे हिरमुसले आहेत.
नगरपरिषद आणि नगर पंचायर्तीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री व्यवसायाला सुगीचे दिवस येतात. मात्र याचवेळी तीन दिवस ड्राय डे जाहीर झाला असल्याने परवानाधारकांचा हिरमोड झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 02/Dec/2025














