Chiplun : गोवळकोटमध्ये बूथ लावण्यावरून दोन गटांत वाद

चिपळूण : शहरातील गोवळकोट रोड येथे बूथ लावण्यावरून सकाळी दोन गटांत किरकोळ राडा झाला. त्याचे परिणाम सायंकाळी मतदानाच्या शेवटपर्यंत पाहायला मिळाले. पैसे वाटपाचाही आरोप झाला तसेच एकमेकांना खुन्नस देण्यात आली. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गोवळकोट रोडवरील वातावरण दिवसभर तणावपूर्ण होते.

गोवळकोटरोड हा भाग प्रभाग क्र. दोन मध्ये येतो. येथे ठाकरे गटाकडून मजर पेचकर, काँग्रेसकडून साजिद सरगुरोह, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून फैसल मेमन, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कबीर कादरी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कादौर परकार असे पाच उमेदवार उभे आहेत. इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात मतदान केंद्र होते. त्या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आतमध्ये बूथ लावल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

त्यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. एकमेकांना खुन्नस दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. त्यामुळे वातावरण तापले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन निवडणूक शांततेत आणि नियमानुसार पार पाडण्याचे आवाहन केले; मात्र उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते चुरशीने मतदान करण्यासाठी पुढे सरसावले. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेताना अनेकजण २०० मीटरच्या आतमध्ये जात होते. त्यामुळे कार्यकर्ते पोलिसांकडे वारंवार तक्रार करत होते तसेच एकमेकांना खुअस देत होते. उमेदवारांना मतदान केंद्रात जाण्याची परवानगी नसताना ते मतदान केंद्रावर कसे काय जातात, अशी विचारणा पोलिसांकडे काहीजण करत होते. सायंकाळी काही उमेदवार पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ तयार करून तो पोलिसांना पाठवण्यात आला. पोलिस निरीक्षक फुलचंद मेगडे यांनी चौकशी केली. त्यात तक्रारीमध्ये तथ्य आढळले नाही; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या केंद्र आणि परिसरातील वातावरण तणावाचे बनले होते.

गोवळकोट रोड येथे मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या, परंतु कधीही वातावरण तणावाचे होऊ दिले नाही. प्रत्येकवेळी शांततेत निवडणुका झाल्या. या वेळच्या निवडणुकीचा मात्र अपवाद आहे. उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली– कबीर कादरी, गोवळकोट रोड, चिपळूण

गोवळकोट रोड येथे उमेदवार पैसे वाटत असत्याचा व्हिडिओ मलाही पाठवण्यात आला होता. मी चौकशी केली असता त्यात पैसे नसून चिट्टी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पैसे वाटल्याचा आरोप चुकीचा होता- फुलचंद मेंगडे, पोलिस निरीक्षक, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 03/Dec/2025