Sangameshwar : लाकडे गोळा करण्यासाठी महिलेवर बिबट्याचा हल्ला

देवरूख : लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना संगमेश्वर तालुक्यातील शिवणे सनगरेवाडी येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर अचानक झडप घातली. परंतु महिलेने मोठे धाडस दाखवत प्रतिकार करून बिबट्याला पळवून लावले. मात्र बिबट्याने झडप घातल्याने बिबट्याची नखे महिलेच्या पायाला लागली आहेत. या महिलेने धाडस दाखवत प्रतिकार केल्याने तिचा जीव वाचला आहे. तर या महिलेच्या धाडसाचे कौतुक होत आहे. साक्षी मंगेश पवार (वय-३८) असे बिबट्याच्या हल्ल्यात बालंबाल बचावलेल्या महिलेचे नाव आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, शिवणे सनगरेवाडी येथील प्रणिता सनगरे, सुप्रिया सनगरे आणि साक्षी पवार या नेहमीप्रमाणे मंगळवारीही जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. लाकडे गोळा करण्यात मग्न असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने साक्षी पवार यांच्या दिशेने झडप घातली. बिबट्याने अचानक झडप घातल्याने क्षणार्धात त्यांना काहीच सुचले नाही. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी न घाबरता या बिबट्याला मोठ्या धाडसाने प्रतिकार केला. वेदनेने हालचालही करणे कठीण झालेल्या साक्षी पवार यांनी मृत्यू समोर उभा असताना जोरात बिबट्याला ढकलले. त्याचवेळी प्रणिता आणि सुप्रिया सनगरे यांनी आरडाओरड केली. साक्षी यांनी धाडसाने बिबट्याला केलेल्या जोरदार प्रतिकाराने घाबरलेल्या बिबट्याने जंगलात धूम ठोकली.

या थरारक घटनेबाबत साक्षी म्हणाल्या कि, मी लाकडे गोळा करत असताना बिबट्याने अचानक झडप घातली. पळायला जागाच नव्हती. जखमी अवस्थेतही मी त्याला दूर ढकललं. आणि माझ्यासोबतच्या दोघींनी मदत केली. नशीब बलवत्तर होतं म्हणून त्याला माझी मान सापडली नाही. घटनेनंतर साक्षी पवार यांच्यावर तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या पायाला बिबट्याची नखे लागली आहेत. दरम्यान, बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याच्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाप्रकारे बिबट्या हल्ला करत असेल तर जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी जायचे कसे? असा सवाल महिलांमधून करण्यात येत आहे. वनविभागाने बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 03/Dec/2025