Dapoli : गिम्हवणेमध्ये घराच्या पडवीला आग;साडेतीन लाखांचे नुकसान

गावतळे : दापोली शहरालगतच्या गिम्हवणे सहकारनगर येथे सोमवारी (ता. १) रात्री अचानक लागलेल्या आगीत अब्दुल हमीद अली मसुरकर यांच्या घराच्या पडवीचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत फ्रीज, वॉशिंग मशीन, अन्य यंत्रसामग्री तसेच लाकूडसाठा जळून खाक झाला. यामध्ये सुमारे ३ लाख ६८ हजार बद्ध रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक पंचनाम्यातून स्पष्ट झाले.

सोमवारी रात्री पडवीतून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. दापोली आणि खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधण्यात आला. दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी तसेच आसपासचे ग्रामस्थ यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे खेड येथून दापोलीकडे येत असलेला अग्निशमन बंब अर्ध्या रस्त्यातून परत पाठवावा लागला. आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार बोंबे, पोलिस ठाण्याचे अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी

तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी मसुरकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घटनास्थळी झालेला प्राथमिक पंचनामा गिम्हवणे ग्राम महसूल अधिकारी गणेश लोहार यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:29 AM 04/Dec/2025