रत्नागिरी : अपंगत्वामुळे व्हीलचेअर हे जग बनलेल्या वर्षाराणी सावंत, दिव्यांग सुषमा सावंत व भंडारपुळे येथील स्मिता पाटील यांना रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनोखी भेट दिली. आरे वारे येथे झिपलाईन आणि मालगुंड येथे पॅरामोटर या धाडसी खेळांचा आनंद या दोघींनी घेतला. यामुळे या दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले.
दिव्यांगांना अशा प्रकारे पर्यटनस्थळी जाणेच खूप कठीण असते; परंतु दिव्यांगांसाठी सर्व ती मदत करणाऱ्या रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. वर्षाराणी श्रीपत सावंत हिला वयाच्या २१व्या वर्षापासून मस्कुलर डिस्ट्रोफी या आजाराने अपंगत्व आले. हळूहळू अंगातली सर्व ताकद कमी होऊ लागली, शरीराचा तोल जाऊ लागला, पायाचे सांधे दुखायला लागले तसे चालणेही कमी झाले. हातात काठी घेऊन चालत होत्या. तशा परिस्थितीतही पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. आता घराबाहेर पडता येत नाही. घरातल्या घरातच हळूहळू स्वतःची कामे करतात. बऱ्याच कामात आईची मदत लागते. अशा परिस्थितीत रत्नागिरी हँडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने तिला पर्यटन सफर घडवली व साहसी खेळांचा आनंद दिला.
या वेळी सूरज चव्हाण, अर्पित भोसले, अर्सलान पटेल, आदित्य पाटील, रसिका वारेकर, तीर्था शिवलकर, सिद्धेश पालिये व जितेंद्र शिंदे आणि सादिक नाकाडे व सदस्य समीर नाकाडे यांनी सहकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:44 AM 04/Dec/2025














