Ratnagiri : जिजाऊ शैक्षणिक संस्थेमार्फत जिल्ह्यात मोफत डेमो पोलिस भरती

देवरुख : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्हा मर्यादित डेमो पोलिस भरती देवरुख येथे ए. एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानात नुकतीच झाली. प्रसंगी देवरुख पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनामार्फत जाहीर झालेल्या १५ हजार पेक्षा जास्त जागांच्या पोलिस भरतीच्या पार्श्वभूमीवर या डेमो भरतीचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील इच्छुक तरुणांना प्रत्यक्ष भरतीपूर्वी स्वतःचे मूल्यमापन करता यावे त्यानंतर त्यात सुधारणा करता याव्यात जेणेकरून या भरतीमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवती पोलिस प्रशासनात रुजू होतील. या उद्देशानेच जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी या डेमो भरतीचे आयोजन केले होते.

या डेमो भरतीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून जवळपास ७५० विद्यार्थी सहभागी झाले होते. जिजाऊ संस्थेचे मोफत चालवले जाणारे एक निवासी प्रशिक्षण केंद्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथे सुरू आहे. याच धर्तीवर रत्नागिरी शहरात १०० विद्यार्थ्यांचे दुसरे निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा सांबरे यांचा मानस आहे.

या डेमो पोलिस भरतीत पहिल्या ७० विद्यार्थ्यांना या निवासी मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश दिले जाणार आहेत. या शिवाय सध्या जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्ह्यात अनिवासी मोफत पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी, लांजा, सापुचेतळे, देवरुख, गुहागर, जाकादेवी या ठिकाणी कार्यरत आहेत. या डेमो भरतीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना वरील जिजाऊ संस्थेच्या केंद्रांमध्ये मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे.

या डेमो पोलिस भरतीच्या व्यवस्थापन व नियोजनात संस्थेचे सचिव श्री केदार चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिजाऊ संस्थेचे स्पर्धा परीक्षा प्रकल्प संचालक संदीप पाटील, वाल्मीक बिलसोरे, भूषण बोरसे, गौरव खर्चे, हर्षल वानखेडे, ओंकार तिवरेकर, साहील गोरे, दिशा भातळे, शीतल बोरसे, तन्वी कोलगे, अक्षरा लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 04/Dec/2025