रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींना इस्रायल देशात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त मो.ए. दुधाळ यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यात सुमारे २ हजार ६०० युवक-युवतींना इस्रायलमधील नॉन वॉर झोनमध्ये क्षेत्रात रोजगाराची संधी असून त्याचा जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घ्यावा. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या व २५ ते ५० वर्षे वयोगटातील किमान १० उत्तीर्ण उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे त्याच कामात किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आणि नूतनीकरणाच्या अंतर्गत कामात तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. तसेच विद्यमान सुविधांचे स्ट्रक्चरल पुनर्वसन, जतन आणि अपग्रेडिंग यामध्ये तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. इस्रायलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हिजा, पासपोर्टसाठी मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे. मेडिकल विमा, राहण्या-जेवणाची सोयही असणार आहे. पात्र उमेदवारांना १ लाख ६२,५०० रुपयेपर्यंत मासिक वेतन दिले जाईल, असे कळवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 04/Dec/2025












