मंडणगड : जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त मंडणगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयात सचिन माळी ऑफिशियल कलाविश्वतर्फे जागृतीपर आणि संदेशात्मक नाटिकेचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. यातून जनजागृती व मनोरंजनात्मक संदेश देण्यात आला.
एचआयव्ही चाचणीसाठी रक्त दिल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या एका तरुणाच्या आयुष्यातील अवघ्या चार तासांच्या या काळात त्याच्या मनात सुरू होणारा विचारांचा कल्लोळ, सामाजिक भान, भीती आणि वास्तवाशी लढा यांचा हृदयस्पर्शी वेध घेणारी ही आयुष्यमान नाटिका उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवून गेली. एचआयव्हीबाबत अज्ञान, चुकीच्या समजुती आणि सामाजिक भीती यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक ताणाचे वास्तववादी चित्रण राजेश शिंदे लिखित संवाद या नाटिकेत दिसून आले. प्रभावी अभिनयाने नाटिकेचे साभिनय सादरीकरण कलाकार सचिन माळी, समिधा सापटे यांनी केले.
पार्श्वसंगीत विजय जोशी, आर्ट साहाय्य अतुल पवार, संगीत संयोजन आकाश पवार, प्रसिद्धी विधान पवार तर साउंड समीर येलवे यांनी सांभाळले. शिक्षक, विद्यार्थ्यांनी या नाटिकेचे कौतुक करत एचआयव्हीविषयक माहिती, चाचणीचे महत्त्व आणि सामाजिक स्वीकार याबाबतचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची प्रतिक्रिया दिली.
या वेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी, समाजसेवक रघुनाथ पोस्टुरे, विजय ऐनेकर, शिक्षकवृंद, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:29 PM 04/Dec/2025












