Khed : घरडा कॉलेजमध्ये ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

खेड : लवेल येथे घरडा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित ५३वे खेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात पार पडत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आज खास अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांची जिज्ञासा आणि प्रकल्पांमधील नवकल्पना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम मी कधीच चुकवत नाही, असे सांगत नव्या पिढीकडून शिकण्यासारखे खूप काही असल्याचे नमूद केले. सायबर सिक्युरिटी, डिजिटल सुरक्षा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताशी संबंधित विविध प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांची कल्पकता, जिद्द आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठळकपणे जाणवला. देशाच्या भविष्याला दिशा देणारी ही पिढी पाहून आनंद होत असल्याचेही अतिथी म्हणाले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना “आपल्या पूर्वजांनी मांडलेले विज्ञानही अभ्यासण्यासारखे आहे. जुने आणि नवे ज्ञान यांचा संगमच खरा विकास घडवतो,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे विशेष कौशल्य ओळखून त्यांना अधिक संधी आणि सुविधा देण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असेही आश्वासन त्यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी नासा आणि इस्रोमध्ये दाखल होत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी अशा प्रतिभांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली. या विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला घरडा फाउंडेशनचे ट्रस्टी श्री. सतीशजी वेंगुर्ले, माजी बांधकाम सभापती मा. अण्णाजी कदम, घरडा कॉलेजचे प्राचार्य मा. प्रमोदजी पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 05/Dec/2025