चिपळूण : चिपळूण शहर परिसरात दि. ८ डिसेंबर रोजी ‘ब्लॅक स्टार्ट’ घेण्याचा निर्णय कोयना जलविद्युत केंद्राच्या नवीन कोयना व चिपळूण येथील व्यवस्थापनाने घेतला आहे. यामुळे काही काळ वीजपुरवठा ठप्प होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात महानिर्मितीची सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यान्वित आहे की नाही हे तपासण्यासाठी ‘ब्लॅक स्टार्ट’ घेतला जातो. त्याचाच हा भाग आहे. त्यामुळे फार काळ वीजपुरवठा खंडीत होणार नाही, असेही संबंधित सूत्रांनी सांगितले आहे. ‘ब्लॅक स्टार्ट’ साठी कळवा येथून एक समितीदेखील दाखल झाल्याचे समजते.
आता कोणत्याही भागात कोठेही तत्काळ वीजपुरवठा करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी संपूर्ण राज्यात वीजपुरवठा खंडित झाल्याचे पाहावयास मिळत असे. त्यावेळी कोयना वीज प्रकल्पातील दोन मेगावॅटचे एक युनिट तत्काळ सुरू व्हायचे आणि त्या विजेवर कोयना विद्युत केंद्रातील १९६० मेगावॅटची विद्युत यंत्रे सुरू करण्यात येत असत. त्यानंतर राज्याला वीजपुरवठा होत असे. मात्र, आता एकाचवेळी राज्यात वीज खंडित होत नाही. तरीही अशाप्रकारची यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही हे पाहण्यासाठी दरवर्षी महानिर्मिती ठिकठिकाणी ब्लॅक स्टार्ट ही चाचणी घेत असते. त्याचाच भाग म्हणून चिपळूणनजिक असणाऱ्या कोयना जलविद्युत केंद्रातील ४०० के.व्ही. नवीन कोयना व चिपळूण येथील वीजपुरवठा ठप्प करून अशाप्रकारची चाचणी घेण्यात येणार आहे. ४०० के. व्ही. चा वीजपुरवठा ठप्प करून कोणत्याही बाह्य मदतीशिवाय तो सुरू करण्याची प्रक्रिया यावेळी तपासण्यात येणार आहे.
अलिकडच्या काळात मोठमोठे जनरेटर त्यासाठी ठेवण्यात आले आहेत. अशीच अत्यावश्यक वेळ आली तर हे जनरेटर सुरू करून विद्युत निर्मिती प्रकल्प सुरू केले जातात. तरीही असलेली यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही हे पाहण्यासाठी ‘ब्लॅक स्टार्ट’ घेतले जाते. त्याचाच भाग म्हणून चिपळूणमध्ये दि. ८ डिसेंबर रोजी ब्लॅक स्टार्ट घेतले जाणार आहे. त्यासाठी कळवा ग्रीड येथून एक समिती दाखल झाली आहे. त्यांच्या उपस्थितीत हे ब्लॅक स्टार्ट केले जाणार आहे. यामुळे फार काळ वीजपुरवठा खंडीत होणार नसल्याचे महानिमिर्तीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:53 AM 08/Dec/2025












