दापोलीत ५०व्या कोकण परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन

दापोली : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विजय क्रीडांगणावर ५०व्या कोकण परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या भव्य स्पर्धेची माहिती रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महामुनी म्हणाले की, या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेसाठी कोकण विभागातील सात जिल्ह्यांतील पोलीस दलातील खेळाडू दापोलीत दाखल झाले आहेत. पालघर, मीरा-भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या विभागांतून शेकडो पोलिस खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली दमदार कामगिरी सादर करण्यास सज्ज झाले आहेत. दापोलीत सध्या या खेळाडूंच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन आज ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. उद्घाटन समारंभासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीने उद्घाटन सोहळ्याला विशेष औचित्य प्राप्त होणार आहे.

या क्रीडा स्पर्धांचा समारोप १३ डिसेंबर रोजी होणार असून त्या दिवशी विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्साहवर्धक स्पर्धामध्ये धावणे, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल तसेच विविध अन्य क्रीडा प्रकारांची रंगतदार सामने रंगणार आहेत.

पत्रकार परिषदेत पोलीस उपाधीक्षक निलेश माइनकर, शैलेश सणस, प्रकाश बेले तसेच दापोलीचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर उपस्थित होते. संपूर्ण दापोली तालुक्यात या स्पर्धाविषयी उत्सुकता असून स्थानिक पातळीवरही क्रीडास्पर्धांच्या आयोजनासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 08/Dec/2025