ST BUS : रत्नागिरी-आंबोळगड बस अचानक रद्द केल्याने प्रवाशांचे झाले हाल

राजापूर : रत्नागिरी-आंबोळगड या महत्त्वाच्या मार्गावर राजापूर आगाराच्या सततच्या मनमानीमुळे प्रवाशांचे हाल संपत नाहीत. रत्नागिरीहून संध्याकाळी सहा वाजता सुटणारी रत्नागिरी-आंबोळगड ही राजापूर आगाराची गाडी अचानक रद्द करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

शनिवारी रत्नागिरीचा आठवडा बाजार असल्याने प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा मोठ्याप्रमाणात होती. राजापूर आगारातून दुपारी दोन वाजता सुटणारी राजापूर-रत्नागिरी बस सायंकाळी सहा वाजता रत्नागिरी आंबोळगड अशी पुढील फेरी करते; मात्र ही गाडी शनिवारी रत्नागिरीत आलीच नसल्याने अनपेक्षित अडचण निर्माण झाली.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रत्नागिरी आगाराने नेहमी ५.३० ला सुटणारी रत्नागिरी-आंबोळगड बस सहा वाजेपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला, परंतु या मार्गावर १०० हून अधिक प्रवासी असल्याने ५०-६० आसनी बसमध्ये जवळपास दुप्पट प्रवाशांना ठासून भरावे लागले. परिणामी प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. काही प्रवाशांनी १०० पेक्षा जास्त लोक बसमध्ये होते, असे सांगितले.
गावखडीच्या पुढे जाणाऱ्या केवळ दोनच बसेस असल्याने आणि त्यापैकी एक राजापूर आगाराची गाडी अचानक रद्द झाल्याने उरलेली ही बस शेवटचा पर्याय ठरली. त्यामुळे विद्यार्थी, महिलावर्ग यांना अक्षरशः कोंबून बसावे लागले. परिस्थिती हाताळण्यासाठी चालक-वाहक यांनादेखील प्रवाशांच्या रोषाचा सामना टाळण्यासाठी सर्वांना बसमध्ये सामावून घ्यावे लागले. याच दरम्यान
गर्दीचा फायदा घेऊन सात ते आठ प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती प्रवासीवर्गातून समोर आली आहे.

राजापूर आगाराचा हा गचाळ कारभार आता नवा राहिलेला नाही. या मार्गावर अवलंबून असलेली सकाळी ५ वाजता आंबोळगडरत्नागिरी ही पहिली आणि एकमेव बस अनेकदा अचानक रद्द केली गेली आहे. प्रवाशांनी ही बाब वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कोणतीच सुधारणा न झाल्याने नाराजी वाढत असून, लवकर सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा पर्याय अवश्य वापरावा लागेल, अशी तीव्र भावना व्यक्त केली जात आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, नियमिततेसाठी आणि वाहतूक व्यवस्थेतील शिस्तींसाठी वरिष्ठांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी वाढत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 08/Dec/2025