दापोली : घरात साखरपुड्याचा आनंद असतानाच दापोलीतील शिवाजी नगर भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हातावर मेहेंदी काढण्यासाठी काढून ठेवलेले तब्बल ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (पाटल्या) अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना ७ डिसेंबर रोजी घडली असून, याप्रकरणी ९ डिसेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगिता संदेश तलाठी (वय ५९, रा. ऐश्वर्या बंगला, शिवाजी नगर, दापोली) यांच्या घरी ७ डिसेंबर २०२५ रोजी साखरपुडा होता. या कार्यक्रमासाठी दुपारी ३:०० वाजता मेहेंदी काढण्यासाठी एक महिला घरी आली होती.
फिर्यादी संगिता यांनी मेहेंदी काढण्यासाठी आपल्या दोन्ही हातातील ६ तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या (किंमत अंदाजे ६,००,०००/- रुपये) काढून बेडरूममधील ड्रेसिंग टेबलच्या पहिल्या ड्रॉवरमध्ये ठेवल्या होत्या. फिर्यादी या आजारी असल्याने त्यांनी औषधे घेतली होती, त्यामुळे मेहेंदी काढल्यानंतर त्या झोपी गेल्या.
गर्दीचा फायदा घेत चोरी
दुपारी ३:०० ते रात्री ११:३० या वेळेत घरात नातेवाईकांची वर्दळ आणि मेहेंदीचा कार्यक्रम सुरू होता. फिर्यादी झोपेत असताना आणि घरातील इतर सदस्य कार्यक्रमात व्यस्त असल्याचा फायदा घेत, अज्ञात चोरट्याने ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले ६ लाखांचे सोन्याचे दागिने शिताफीने चोरून नेले.
पोलिसांत गुन्हा दाखल
साखरपुडा आणि मेहेंदीच्या गडबडीत दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी शोधाशोध केली, मात्र दागिने मिळून आले नाहीत. अखेर ९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रकरणी दापोली पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर २३३/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५ (अ) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घरातून दागिने चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:56 AM 11/Dec/2025













