मंडणगड : मंडणगडपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या आंजर्ला-नार्गोली मार्गावर (१० डिसेंबर) पहाटे २.२० वाजताच्या सुमारास एस. टी. बसचा गंभीर अपघात झाला. रस्त्यावरील वळणदार उतारावर बसचे नियंत्रण सुटल्याने ही बस जवळपास ५० फुट खोल दरीत कोसळली. अपघात अत्यंत भीषण असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या अपघातग्रस्त बसमध्ये एकूण १६ प्रवासी होते. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले असून त्यापैकी बस वाहक के. डी. चाटे हे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते. चाटे यांच्या डाव्या गुडघ्याला मार, उजव्या पायाला खोल जखम तसेच कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. उर्वरित दोन प्रवाशांना किरकोळ मार लागला असून त्यांचा जीवितास धोका नाही. नागरोली गावापुढे सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या धोकादायक यू-टर्नवर हा अपघात घडला. डावीकडे वळण आणि उतार असलेल्या या रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. चालक व्ही. पी. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा ब्रेक अचानक काम न करणे हे अपघाताचे प्रमुख कारण ठरले. ब्रेक निकामी झाल्यानंतर वाहन पूर्णपणे अनियंत्रित बनले आणि बस सरळ दरीत कोसळली. या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले.
सर्व प्रवासी, चालक आणि वाहक यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मार्ग तपासणी पथकाच्या मदतीने सर्व जखमींना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित प्रवाशांना मंडणगड येथे सुरक्षित पोहोचवण्यात आले. ही अपघातग्रस्त बस खोल दरीत अडकलेली असल्याने तिला बाहेर काढण्यासाठी क्रेनची आवश्यकता आहे. सकाळी क्रेन उपलब्ध झाल्यावर बस बाहेर काढण्याचे काम सुरू होणार आहे. काही प्रवाशांच्या बॅगा, पिशव्या आणि मोबाईल यांसारख्या वस्तू बसमध्ये अडकलेल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघातामुळे आंजर्ला-मंडणगड मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मात्र, कोणतीही मोठी दुर्घटना न घडता सर्व प्रवासी सुखरूप बचावले, ही मोठी दिलासादायक बाब आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 11/Dec/2025












