रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील कसोप येथे पार पडलेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात (Taluka Level Science Exhibition) श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या ‘रेल्वे सेफ्टी फ्लॅप’ (Railway Safety Flap) या उपकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
१०७ प्रतिकृतींमधून मारली बाजी
सर्वांकष विद्यालय, कसोप येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर दरम्यान हे भव्य विज्ञान प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांमधून एकूण १०७ विज्ञान प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या. या कठीण स्पर्धेत श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाने आपली वेगळी छाप पाडली.
काय आहे ‘रेल्वे सेफ्टी फ्लॅप’ प्रकल्प?
रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यातील अंतरामुळे किंवा गर्दीमुळे वारंवार अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘रेल्वे सेफ्टी फ्लॅप’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली. या उपकरणाच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवर होणारे अपघात टाळणे शक्य होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणात स्पष्ट केले.
यशस्वी विद्यार्थ्यांची टीम
या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी कु. अस्मित डांगे, कु. पियुष हंगीरगेकर, कु. अविष्कार पावसकर, कु. स्वरित घवाळी आणि कु. साक्षी वाघाटे या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांना विद्यालयाच्या जेष्ठ विज्ञान शिक्षिका सौ. अनन्या कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर यांच्या प्रेरणेतून आणि सहकार्यातून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असून, सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 11/Dec/2025












