राजापूर : ओणी-अणुस्कुरा मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यामुळे प्रवाशांसह वाहन चालकांना अतोनात त्रास होत असून समस्याचा सामना करावा लागत आहे. याबाबत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसांत मार्गावरील खड्डे बुजवून संपूर्ण मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा तालुक्याच्या पूर्व परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन राजापूर बांधकाम विभागाला दिले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
ओणी-अणुस्कुरा हा क्रमांक १५० राज्यमार्ग असून गेल्या काही महिन्यांपासून त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्यामुळे बहुतांशी मार्गाची चाळण झाली आहे. सुरवातीच्या काळात रस्त्यावर खड्डे असे चित्र होते. आता तर ओणी पासून पाचलपर्यंतच्या मार्गावर विविध ठिकाणी खड्धाचे साम्राज्य पसरल्याने आता खड्यात रस्ता असे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने ओणी दैतवाडी परिसर, सौन्दल पाटीलवाडीचा भाग, सौन्दल बाजारपेठ, कोळवणखडी, येळवण, रायपाटण, पाचल आदी भागात तर संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचलपासून अणुस्कुरा घाटापर्यंत पडलेले खड्डे पॅच मारून बुजविले आहेत. मात्र बहुतांश भागातील खड्डे नेमके केव्हा बुजविले जाणार याबाबत निश्चिती नसल्याने या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह विविध प्रकारच्या वाहन चालकांना आतोनात त्रास होत असून कोणता खड्डा चुकवायचा असाच प्रश्न त्यांच्या समोर ठाकला आहे. एवढी विदारक स्थिती या रस्त्याची बनली
आहे.
गेली चार-पाच वर्षे ओणी अनुस्कुरा मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. अहोरात्र या मार्गावर कायम वर्दळ सुरु असते. बहुतांशी भाग खड्डेमय बनल्याने प्रवाशांसह वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय. तालुक्याच्या पूर्व परीसराला जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे.
आजूबाजूच्या गावांमधील विद्यार्थी वर्ग रायपाटण, पाचल, ओणी, राजापूर सह लांजा येथे शिक्षणासाठी नित्य ये जा करीत असतात. सर्वप्रकारचे खरेदीदार पाचल, ओणीकडे ये-जा करीत असतात. दर बुधवारी पाचलचा, तर रविवारी सौन्दलचा बाजार असतो. तसाच बाजार ओझर येथे देखील भरतो. परिसरवासीय खरेदीसाठी जात असतात. पूर्व परिसरातील अत्यवस्थ रुग्णाला अधिक उपचारार्थ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई कडे नेताना त्या रुग्णाला या खक्यामुळे अधिक त्रास होतो. यापूर्वी काही दुचाकीस्वार खड्यामुळे पडल्याच्या काही घटनादेखील घडलेल्या आहेत.
या निवेदनात आणखी अपघात होण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरवासीय खूपच त्रस्त आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले आणि ओणी अनुस्कुरा मार्गावर पडलेले खड़े तत्काळ बुझवून संपूर्ण मार्गाची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. ओणी-अणुस्कुरा मार्गाची देखभाल पहाणारे अधिकारी स्वप्नील बावधनकर यांनी ते निवेदन स्वीकारले. याप्रसंगी अरविंद लांजेकर, प्रसाद पळसुलेदेसाई, प्रकाश पाताडे, संदेश आंबेकर, राजेश खानविलकर, चंद्रकांत कानेटकर उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पाहणी करावी
समस्त अधिकारी वर्गान रस्त्यावर उतरून संपूर्ण रस्त्याची पाहणी करावी म्हणजे जनता कशी त्रस्त आहे. समस्याचा कसा सामना करतेय हे त्यांच्या लक्षात येईल असे ठळकपणे नमूद करताना पुढील आठ दिवसांत जर पडलेले खड्डे बुजविले गेले नाहीत तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 11/Dec/2025












