लांजा : यात्रेला दुकानाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या कॅरी टर्बो टेम्पो व एसटी बस यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघात टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान लांजा-साटवली मार्गावर साटवली डंगाचा कोपरा येथे घडला.
या अपघातात फिरोज ईकबाल शेख (वय ३८, रा. वेंगुर्ला-आरवली, ओरस) असे गंभीर जखमी झालेल्या टेम्पो चालक यासह टेम्पो मधील अन्य जखमींमध्ये तिघांचा समावेश आहे. सलमाना फिरोज शेख (३५), योगेश रमाकांत राऊळ व योगिनी योगेश राऊळ असे टेम्पोमधील एकूण चौघेजण जखमी झाले आहेत. सर्वांना लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी चालकाला अधिक उपचारासाठी ओरस येथे पाठवण्यात आले.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा आगाराची साटवली-लांजा एस टी बस (एम एच १४, बीटी १४८३) साटवली येथून लांजाच्या दिशेने येत होती. एस टी बस गोळवशी येथील एका अवघड वळणावरील डंगाचा कोपरा येथे आली असता याच दरम्यान राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथे यात्रोत्सवाला जाणारा सुपर कॅरी टर्बो कंपनी चा टेम्पो (एमएच ०७, एजे ०१७२) आला असता दोघांमध्ये समोरा समोर जोरदार धडक बसली.
टेम्पो फिरोज शेख चालवत होता. देवीहसोळ येथे यात्रा असल्याने टेम्पो लांजाहुन दुकानाचे साहित्य घेऊन निघाला होता. दोन्ही वाहनांची धडक एव्हढी भीषण होती की, टेम्पोच्या समोरील बाजूचा अक्षरशः चक्काचूर झाला. टेम्पोचालक आत मध्येच अडकून पडला होता, तर मागे बसलेले प्रवासीही जखमी झाले. अपघात घडताच एसटी प्रवासी व ये-जा करणाऱ्या इतर वाहन चालकांनी टेम्पोमध्ये अडकलेल्या चालकाला अथक प्रयत्नाने बाहेर काढले व सर्व जखमींना उपचारासाठी लांजा रुग्णालय येथे हलवले. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास लांजा पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 12/Dec/2025












