खेड : तालुक्यातील न्यू मांडवे लघु पाटबंधारे प्रकल्पाला सन २००१ साली मंजुरी मिळूनही अद्याप काम पूर्णत्वास गेलेले नाही. प्रकल्पासाठी आवश्यक अंतिम प्रशासकीय मान्यता व निधी न मिळाल्याने योजना रखडल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने प्रकल्पाला मंजुरी व १४४ कोटी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे पत्र दिले आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात याबाबत कोणता निर्णय होतो याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.
मंत्री कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या सिंचनाखाली येणार असून सिंचन व वीज विभागांचे अनेक तांत्रिक समन्वय प्रलंबित आहेत. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती २ यांचेकडील शिफारसीनुसार सुधारित अंदाजपत्रक शासनस्तरावर सादर करण्यात आले आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी तब्बल १४४ कोटींची आवश्यकता असल्याचेही पत्रात नमूद आहे.
न्यू मांडवे लघु पाटबंधारे योजनेचा कंत्राट प्रक्रियेसाठी आवश्यक अंतिम मान्यता मिळणे अत्यावश्यक असल्याने लवकरात लवकर निर्णय घेतला जावा, अशी मागणी कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेची वर्षानुवर्षे प्रलंबित स्थिती, स्थानिकांना होत असलेल्या गैरसोयी लक्षात घेता, राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 12/Dec/2025












