रत्नागिरी: खेड तालुक्यातील चिंचघर रेवेचीवाडी येथे अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीची काच सरकवून आत प्रवेश करत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत चोरट्याने कपाटातील लॉकर उघडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याप्रकरणी गणेश सखाराम सुर्वे (वय ५०, व्यवसाय- ड्रायव्हर, रा. चिंचघर, रेवेचीवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक ०२/१२/२०२५ ते ०८/१२/२०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५.०० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी गणेश सुर्वे यांच्या घराच्या बेडरुमच्या पूर्व दिशेला असलेल्या खिडकीची काच अज्ञात चोरट्याने सरकवली आणि त्यावाटे घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने लोखंडी कपाटात साड्यांच्या कप्प्यात ठेवलेली लॉकरची चावी शोधून काढली. या चावीने लॉकर उघडून त्यातील रोख रक्कम ६,००० रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण ७६,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी गणेश सुर्वे यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ (BNS) चे कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा (गु.र.नं. ३७०/२०२५) अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 12/Dec/2025












