देवरूख नगरपंचायतीकडून “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” अंतर्गत स्वच्छता उपक्रमांचे आयोजन

देवरूख : देवरुख नगरपंचायत प्रशासनाने “स्वच्छ भारत मिशन अंतर्गत” राबविण्यात येणाऱ्या “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” तसेच “माझी वसुंधरा अभियान ६.०” मोहिमेत नागरिकांच्या सक्रिय सहभागासाठी विविध स्वच्छता व जनजागृती कार्यक्रमांचे भव्य आयोजन केले आहे. याकरिता नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गांची विविध पथके तयार करून तसेच स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, पर्यावरणप्रेमी आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान प्रमुख कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती जनजागृती मोहीम, घर-घर कंपोस्ट खत करणेबाबत मार्गदर्शन, शहरातील नदीपात्रांची स्वच्छता, मंदिर परिसर स्वच्छता व निर्माल्याचे कंपोस्ट खत करणेचे मार्गदर्शन, स्वच्छता शपथ कार्यक्रम, शाळा महाविद्यालयांमधून जनजागृती, कंपोस्टिंगविषयी विशेष कार्यशाळा तसेच शहराच्या घनकचरा प्रकल्पावर शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास भेटीसाठी संधी अशा अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

आज देवरूख नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत भोसले व स्वच्छता निरीक्षक आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दुबळेश्वर मंदिर (देवरूख शाळा क्र. १) येथील सप्तलिंगी नदी घाट परिसराची व निळकंठेश्वर मंदिर वरची आळी येथील सप्तलिंदी नदी घाट परिसराची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी मंदिर कमिटीला निर्माल्यापासून कंपोस्ट खत कसे करावे याचे मार्गदर्शन देण्यात आले. सदर स्वच्छता मोहिमेकरिता देवरूख नगरपंचायत आठल्ये सप्रे-पित्रे महाविद्यालय देवरूख N.S.S. विभागाचे विद्यार्थी, देवरूख शाळा क्र. १ चे विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.

यावेळी देवरूख महाविद्यालयाचे प्राध्यापक सुनिल सोनवणे सर यांनी नदीपात्राच्या स्वच्छतेमुळे तसेच संवर्धनामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी नदी संवर्धनाची शपथ घेतली. यानंतर देवरूख नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी सहभागी सर्व विद्यार्थी व नागरिक यांच्याप्रति आभार व्यक्त करताना, “स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये उत्तम स्थान मिळवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून स्वच्छतेबाबत दीर्घकालीन शाश्वत सवयी रुजवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.” असे सांगत पुढील उपक्रमांमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” मध्ये नगरपंचायतीला यापूर्वी मिळालेल्या मानांकनाप्रमाणे उच्च श्रेणी मिळावी यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 12/Dec/2025