राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीचा डंका! पुष्कराज अकॅडेमीचे ११ खेळाडू भोपाळला रवाना

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बाब समोर आली आहे. भोपाळ येथे होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी (68th National Shooting Championship) जिल्ह्यातील पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडेमीचे ११ नेमबाज रवाना झाले आहेत. हे खेळाडू ५० मीटर रायफल प्रकारात आपल्या कौशल्याची चुणूक दाखवणार आहेत.

भोपाळमध्ये रंगणार नेमबाजीचा थरार

भोपाळ (मध्य प्रदेश) येथील एम. पी. शूटिंग अकादमी येथे ११ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत ही प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत देशभरातील नामवंत खेळाडू सहभागी होत असून, रत्नागिरीचे हे ११ शिलेदार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

निवड झालेले ११ गुणवंत नेमबाज

Hotel star caters

या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये रत्नागिरी शहर, ग्रामीण भागासह बाहेरगावाहून रत्नागिरीत प्रशिक्षणासाठी आलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

रत्नागिरी: दिग्विजय आनंद चौगुले (नवनिर्माण हायस्कूल), सोहम जीवन जाधव (सेंट थॉमस हायस्कूल).

ग्रामीण विभाग: साहिल उल्हास मुळये (जाकादेवी), ऐश्वर्य दिनेश सावंत (सडामिऱ्या), सिद्धी कासार (खंडाळा), देवर्षि कासार (जिंदाल विद्या मंदिर, जयगड).

इतर जिल्हे: पार्थ परेश तोडकर (श्रीवर्धन, रायगड), कुमुदिनी संदेश तनपुरे आणि हर्षदा प्रशांत तनपुरे (पुणे व पिंपरी चिंचवड).

हे सर्व खेळाडू सध्या रत्नागिरीतच सराव करत असून त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर ही मजल मारली आहे.

तज्ज्ञ मार्गदर्शकांचा लाभ

हे सर्व खेळाडू रत्नागिरीतील नामांकित ‘पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमी’ येथे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) मान्यताप्राप्त ‘ग्रेड ए’ कोच सौ. राजेश्वरी पुष्कराज इंगवले आणि आंतरराष्ट्रीय परवानाधारक प्रशिक्षक श्री. पुष्कराज जगदीश इंगवले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे.

रत्नागिरीतील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर धडक मारल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून, स्पर्धेतील यशासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 16/Dec/2025