खेडमध्ये मध्यरात्री गोवंश तस्करीचा प्रयत्न फसला! आंबडस फाट्यावर पोलिसांचा सापळा; ४ बैलांची सुटका, सांगलीच्या दोघांसह तिघे गजाआड

◼️ कत्तलीसाठी नेले जाणारे ४.९० लाखांचे मुद्देमाल जप्त; पिकअपमध्ये कोंबून भरले होते बैल; खेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

खेड/रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश तस्करी रोखण्यासाठी पोलीस दल सतर्क झाले आहे. खेड (Khed) पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आंबडस (Ambdas) येथे मोठी कारवाई करत कत्तलीसाठी होणारी जनावरांची तस्करी उधळून लावली आहे. बोलेरो पिकअपमधून दाटीवाटीने आणि क्रूरपणे कोंबून नेले जाणारे ४ बैल पोलिसांनी सुखरूप सोडवले असून, याप्रकरणी सांगलीतील दोघांसह स्थानिक एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

नेमकी कारवाई काय?

खेड पोलिसांचे एक पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ०२.४५ वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील आंबडस बस स्टॉप जवळ एक संशयास्पद बोलेरो पिकअप (MH 50 N 5476) पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीच्या हौद्यात ४ लहान-मोठ्या आकाराचे बैल अत्यंत दाटीवाटीने आणि अखूड दोरीने क्रूरपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच चालक आणि त्याच्या साथीदारांकडे जनावरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा वाहन चालवण्याचा परवाना (Driving License) नसल्याचे निष्पन्न झाले. ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय पोलिसांना आला.

४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी या कारवाईत एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १) बोलेरो पिकअप गाडी (MH 50 N 5476) – किंमत ४,००,०००/- रुपये. २) ४ लहान-मोठे बैल – किंमत ९०,०००/- रुपये.

आरोपींची नावे: याप्रकरणी पोलिसांनी खालील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे: १) संजू राजू साळुंखे (वय ३१, रा. हिंगणगाव बुद्रुक, ता. कडेगाव, जि. सांगली) २) रोहन अंकुश साळुंखे (वय २१, रा. हिंगणगाव बुद्रुक, ता. कडेगाव, जि. सांगली) ३) संजय गंगाराम चव्हाण (वय ३४, रा. आंबडस बस स्टॉप जवळ, ता. खेड, जि. रत्नागिरी) – स्थानिक मदतनीस.

गुन्हा दाखल

फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल अशोक विठ्ठल मुंडे (नेमणूक: खेड पोलीस ठाणे) यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात खालील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम: कलम ५(अ)(१), ९ (प्राण्यांची कत्तल आणि अवैध वाहतूक).

मोटर वाहन अधिनियम: कलम १९२(अ), ३(१८१) (विना परवाना वाहन चालवणे).

महाराष्ट्र पोलीस अधिनियम: कलम ११९.

भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३: कलम ३(५) (संगनमत).

मध्यरात्रीच्या वेळी खेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे प्राणीप्रेमी आणि नागरिकांमधून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:46 30-12-2025