रत्नागिरी : राज्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा १० नोव्हेंबर रोजी होत असून जिल्ह्यात या परीक्षेला २ हजार ६९६ इतके उमेदवार बसणार आहेत. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- एक, १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- दोन, दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी तब्बल २ हजार ६९६ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सुमारे तीन वर्षांनंतर टीईटी परीक्षा होत असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत.
राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) नोव्हेंबर २०२४ येत्या १० नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांत आयोजित केली जाणार आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे व सुरळीतपणे घेण्याच्या दृष्टीने राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाईन टीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात विचार केला होता. परंतु, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विविध भाषेमध्ये तयार करण्यात अडचणी येत असल्याने टीईटी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला. त्यादृष्टीने आता तयारी करण्यात आली आहे. राज्यातील १०२९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. विविध केंद्रप्रमुख, शिक्षणाधिकारी यांच्या बैठका परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जात असून परीक्षेच्या नियोजनाची जय्यत तयारी केली जात आहे.
जिल्ह्यात पाच केंद्र असून पेपर एकसाठी १ हजार ७७, तर पेपर दोनसाठी १ हजार ६१९ असे एकूण २ हजार ६९६ विद्यार्थी बसणार आहेत. या नियोजनासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 29/Oct/2024
