रत्नागिरी : शासकीय स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत रेशनकार्डधारकाच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे. एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल किंवा ती व्यक्ती विदेशी असेल तर तिचे रेशनकार्ड रद्द होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सवलतीच्या धान्याचा लाभप्राधान्य आणि अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना दिला जात आहे. मात्र, योग्य लाभार्थ्यापर्यंत धान्याचा लाभ पोहोचविण्यासाठी अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार १ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीत अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्यानुसार शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी रेशनदुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिका तपासणी नमुना विनामुल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
पडताळणी मोहीम सुरू
शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार रेशनकार्डधारकांच्या माहितीचा अर्ज सर्व कागदपत्रांसह ३० एप्रिलपर्यंत क्षेत्रिय कार्यालयाकडे द्यावा लागेल.
ही दोन कागदपत्रे तयार ठेवा
उत्पन्नाचा दाखला : अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला या शोधमोहिमेत तपासला जाणार आहे. उत्पन्न अधिक असल्यास त्या लाभार्थ्यांचा लाभ रद्द होणार आहे.
रहिवासी प्रमाणपत्र : विदेशी व्यक्तींना रेशनकार्ड दिले जाणार नाही. त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र पाहिले जाणार आहे.
कधीपर्यंत चालणार मोहीम
१ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत शिधापत्रिका शोध मोहीम राबविली जात आहे. संशयास्पद रेशनकार्ड वाटल्यास पोलिसांकडून तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेचा लाभमिळावा, या हेतुने दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, व मयत व्यक्तीची नावे वगळण्यात येणार आहेत. ही मोहीम ३१ मे पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे. – रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:55 PM 12/Apr/2025














