रत्नागिरी : अंगणवाडी सेविकांना दिवाळी सुट्टी जाहीर

रत्नागिरी : अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३०० दिवस पोषण आहार मिळावा, यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन टप्प्यांत दिलेल्या सुट्टीला विरोध झाल्यानंतर बुधवारी हा निर्णय शासनाने मागे घेतला. आता अंगणवाडी सेविकांना व मदतनिसांना दि. २७ ऑक्टोबर ते दि. ४ नोव्हेंबरपर्यंत सलग दिवाळीची सुट्टी असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करत त्यांच्या कामाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे.

अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३० दिवस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना दि. ३१ ऑक्टोबर ते दि. ७ नोव्हेंबर तर मदतनीस यांना दि. १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी मंजूर केल्याचा आदेश काढला होता. मात्र, याला अंगणवाडी सेविका व मदतनिसांकडून तीव्र विरोध झाला.

तसे पत्र संघटनेने एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त यांना पाठवले. त्यानंतर शासनाने हा आदेश मागे घेत दि. २७ ऑक्टोबर ते दि. ४ नोव्हेंबरपर्यंत सलग दिवाळीची सुट्टी जाहीर केली. दरम्यान, शासनाने या महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन वाढवले आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजारांवरून १३ व सेवाज्येष्ठता वाढ, मदतनिसांचे मानधन ५ हजारांवरून ७५०० व सेवाज्येष्ठता वाढ असे करण्यात आले आहे. मात्र, त्याचबरोबरीने त्यांच्या वेळेत २ तासांनी वाढ केली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी त्यांची वेळ असेल. त्यातील दोन तास हे गृहभेटीचे असणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 30/Oct/2024