रत्नागिरी : भाटकरवाडा येथील शिवकालीन टेहळणी बुरुजाजवळ भराव टाकून अतिक्रमण

रत्नागिरी : रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यालगतच्या भाटकरवाडा येथील समुद्रात असलेल्या शिवकालीन टेहळणी पाणबुरुजाजवळ भराव टाकून अतिक्रमण झाले आहे. याप्रकरणी उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे आ. उदय सामंत यांच्याकडे पेठकिल्यातील ग्रामस्थांनी पुराव्यासह तक्रार करण्याचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी बंदर विभाग आणि रत्नागिरी नगरपरिषदेकडे अतिक्रमणासंदर्भात तक्रारी केल्या जात आहेत. येथे भराव टाकून घरे बांधण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षकांनी घेतलेल्या बैठकीतही हा अतिक्रमण मुद्दा उपस्थित झाला आहे.

श्री भगवती मातेचे मंदिर असलेल्या रत्नदुर्ग किल्यालगत भाटकरवाडा समुद्रात शिवकालीन टेहळणी बुरुज आहे. या बुरुजाच्या आजुबाजूला माती दगडांचा भराव टाकून तेथे अनधिकृतपणे घरे उभारली गेली आहेत. भाटकरवाडा, कोठारवाडी, कुरणवाडी या ठिकाणच्या रस्त्यावर परस्पर टाकण्यात आलेले गतिरोधक रत्नागिरी नगर परिषदेने काढून टाकले. यावेळी याठिकाणी काहीसा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षकांनी शांतता अबाधित रहावी यासाठी बैठक घेतली. यावेळी टेहळणी बुरुजाजवळच्या अतिक्रमणच्या मुद्दाही उपस्थित झाला.

पाणबुरुजाजवळ अतिक्रमण झाले असल्याची भाटकरवाड्यातील ग्रामस्थांनी मान्य केले. याठिकाणी मंजूर रस्ता होईल तेव्हा हे अतिक्रमण काढले जाईल, असेही भाटकरवाड्यातील ग्रामस्थांकडून पोलीस निरीक्षकांना सांगण्यात आले. या रस्त्यासाठी तेथील स्थानिकांनी जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी पेठकिल्यातील ग्रामस्थ शिवकालीन बुरुजाजवळचे अतिक्रमण हटवण्यासाठी आक्रमक झाले आहे. हा बुरुज आणि परिसर बंदर विभागाच्या अधिकार क्षेत्रात असल्याने आणि घरबांधणीसाठी परवानगी देणार्‍या रत्नागिरी परिषदेकडे तक्रारी करण्यात येत आहेत. या संदर्भातील कारवाई तातडीने व्हावी यासाठी पेठकिल्यातील ग्रामस्थ उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन तातडीने अतिक्रमण हटवण्याची मागणी करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 15-01-2025