दापोली : तालुक्यातील कर्दे ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कर्दे किनारी आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एकाचवेळी विद्यार्थ्यांनी सूर्यमालेतील चार ग्रह पाहिले. हा उपक्रम सरपंच सचिन तोडणकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता.
विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि विज्ञान याची आवड निर्माण व्हावी, यासाठी आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी तारांगण ग्रुप चिपळूणचे दीपक आंबवकर यांनी अवकाशातील गमतीजमती अगदी सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या. त्यांनी सर्वप्रथम लेझर पॉईंटरने ठळक तारे, ग्रह, तारकासमूह, नक्षत्र, राशी, तारका गुच्छ यांची माहिती दिली. तारकासमूहांच्या आकृत्या लेझर पॉईंटरद्वारे तयार करून विद्यार्थ्यांना नक्षत्रांची ओळख करून दिली. त्यानंतर सर्वप्रथम पश्चिम आकाशात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा तेजस्वी शुक्र ग्रह तसेच आकाशातील देखणे रत्न म्हणजे शनी यांचे निरीक्षण दुर्बिणीद्वारे केले. शनी ग्रह आणि त्याच्याभोवती असणाऱ्या मनोहारीकडे पाहताना मुलांना खूपच आनंद झाला होता. सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू तोपर्यंत पूर्वेकडे उगवला होता.
या अनोख्या आकाशदर्शन कार्यक्रमाचा लाभ आपल्या गावातील विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी सरपंच सचिन तोडणकर तसेच ग्रामस्थ, व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक अनिल मळगे, शिक्षक सुशांत केळसकर, शाळा समिती अध्यक्ष दिनेश रूके, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ यांनी अतिशय उत्तम नियोजन केले होते. दीपक आंबवकर तारांगण ग्रुप चिपळूण यांनी सायंकाळी ७ वाजता सुरू केलेला आकाश निरीक्षण कार्यक्रम अतिशय उत्साहात रात्री १० वाजता संपला. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम माहिती दीपक आंबवकर यांनी विद्यार्थी व ग्रामस्थ यांना दिली. कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी दीपक आंबवकर यांचे आभार मानण्यात आले. तालुक्यातील इतर शाळांनी विद्यार्थ्यांकरिता असे कार्यक्रम आयोजित केले, तर भावी पिढीला खगोलशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा होऊ शकतो, असे कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर यांनी सांगितले.
गुरूसह वार चंद्रही पाहिले
गुरू आणि त्याचे चार चंद्र आयो, युरोपा, गॅनिमिड आणि कॅलिस्टो खूपच सुंदर दिसत होते. त्याचे दोन चंद्र वर आणि दोन खाली होते. त्यानंतर द्वादशीचा चंद्र आणि त्यावर असणारी विवरे स्पष्ट दिसत होती, हे आंबवकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 15/Jan/2025
