मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याची आणि त्यासाठी ‘प्रहार’ संघटनेच्या विलिनीकरणाची अट घालण्यात आल्याची चर्चा जोरात सुरू आहे. यावर आता खुद्द बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी केवळ आमदारकीसाठी पक्ष विलीन करणार नाही, अशी ठाम भूमिका घेत शिंदे गटाला थेट संदेश दिला आहे.
“मी पद मिळवण्यासाठी युती करत नाही”
आमदारकीच्या चर्चेवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “विधान परिषदेची आमदारकी मला मिळणार असल्याचे मी प्रसारमाध्यमांमधून ऐकलं आहे, मात्र शिंदेंकडून मला थेट चर्चेसाठी कोणतंही बोलावणं आलेलं नाही. मी मुद्द्याची लढाई लढणारा माणूस आहे. आम्ही केवळ आमदारकीसाठी पक्ष विलीन करणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न, हमीभाव आणि कर्जमाफी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमचा भर आहे. मुद्दा असेल तरच आम्ही पुढे पाऊल टाकू.”
विलिनीकरणाच्या चर्चेवर काय म्हणाले कडू?
शिंदे गटात विलिनीकरणाची अट घालण्यात आल्याच्या बातम्यांवर बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “जेव्हा मी विलिनीकरणाच्या बातम्या वाचल्या तेव्हा खूप दुःख झालं. ‘प्रहार’ ही संघटना सुमारे एक लाख सदस्य आणि ५ ते १० लाख दिव्यांग बांधवांच्या कष्टाने उभी राहिली आहे. शिवसेनेतील बंडखोरीतून प्रहारची निर्मिती झाली आणि २५ वर्षे मी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता ही संघटना चालवली आहे. मी केवळ आमदारकीसाठी जाण्याइतका ‘नालायक’ नाही.”
एकनाथ शिंदेंशी चर्चा झालेली नाही
उदय सामंत यांच्याशी काही गोष्टींवर चर्चा झाली असली, तरी एकनाथ शिंदे यांच्याकडून विधान परिषद उमेदवारीबाबत आपल्याला कोणताही फोन किंवा संदेश आलेला नाही, असेही कडू यांनी स्पष्ट केले. “जर एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली, तर आम्ही त्यांचे पाईक बनून काम करू आणि शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करू. मात्र, आमदारकी असो वा विलिनीकरण, त्याबाबत चर्चेविना काहीही बोलू शकत नाही,” असे कडू यांनी नमूद केले.
आगामी राजकीय वाटचाल
बच्चू कडूंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी आपण सत्तेच्या लोभापायी तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आता शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देतो आणि ‘प्रहार’ विरुद्ध ‘शिंदेसेना’ या वादावर तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 29-04-2026














