कोकण, विदर्भासह २७ जिल्ह्यांना मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा
विशेष प्रतिनिधी: Maharashtra Rain News अंतर्गत राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुठे पावसाने विश्रांती घेतली आहे तर कुठे जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान, आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे १७ ऑगस्टपर्यंत राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानाची ही सविस्तर माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
१५ ऑगस्ट पावसातच; ‘या’ २७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक १७ ऑगस्टपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश, तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा तब्बल २७ जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत आहे. विशेष म्हणजे यंदाचा स्वातंत्र्यदिन म्हणजेच १५ ऑगस्ट हा पावसाचाच असणार आहे.
तर दुसरीकडे, उर्वरित मराठवाडा, अहिल्यानगर आणि सोलापूर या ९ जिल्ह्यांमध्ये मात्र केवळ ठिकठिकाणी किरकोळ वा तुषार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र; मान्सूनच्या वाऱ्यांना मिळणार बळकटी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Depression) अरबी समुद्रातील पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे वारे अधिक दक्षिण-वायव्येकडे सरकल्यास ऑगस्टच्या उर्वरित शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते, असा अंदाजही खुळे यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील निम्मा भाग चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत; शेतकरी चिंतेत
सुरुवातीच्या काळात मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर आणि विदर्भातील काही भागांत चांगला पाऊस झाल्यामुळे तेथील नद्या-नाल्यांना पूर आला होता आणि धरणांच्या साठ्यात मोठी वाढ झाली होती. मात्र, सध्या राज्याच्या निम्म्याहून अधिक भागात दमदार पावसाने दांडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या असून उगवलेली पिके वाया जाण्याच्या भितीने बळीराजा सध्या चांगल्या पावसाच्या तीव्र प्रतिक्षेत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 14-08-2026














