ज्युनियर असोसिएट पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु; ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
विशेष प्रतिनिधी: SBI Clerk Recruitment 2026 अंतर्गत बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने (SBI) ‘ज्युनियर असोसिएट’ (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदांच्या तब्बल ९ हजार ७६६ जागांसाठी महाभरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
एकूण ९,७६६ रिक्त जागा; महाराष्ट्रात सर्वाधिक १७१८ पदे
या भरती मोहिमेद्वारे एकूण ९,७६६ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये ७,६८० नियमित पदे आणि २,०८६ बॅकलॉग पदांचा समावेश आहे. देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी या पदांची विभागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, नियमित जागांच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वाधिक १,७१८ पदे भरली जाणार आहेत. यानंतर तामिळनाडूमध्ये १४१०, ओडिशामध्ये ११००, कर्नाटकमध्ये ७६० आणि पश्चिम बंगालमध्ये ५५५ पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार
या भरतीसाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाणार आहे: १. प्राथमिक परीक्षा (Prelims Exam): प्रथम टप्प्यात ऑनलाईन पूर्व परीक्षा घेतली जाईल. २. मुख्य परीक्षा (Mains Exam): पूर्व परीक्षेत यशस्वी ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. ३. स्थानिक भाषा चाचणी (Local Language Test): मुख्य परीक्षेनंतर संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेतील प्राविण्य चाचणी घेतली जाईल.
या तिन्ही टप्प्यांतील कामगिरीच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
अर्ज कसा आणि कधीपर्यंत करावा?
- अर्ज सुरू होण्याची तारीख: ११ ऑगस्ट २०२६
- अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२६
अशी आहे अर्ज प्रक्रिया: १. उमेदवारांनी प्रथम SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला (sbi.co.in) भेट देऊन Careers विभागात जावे. २. तेथे Junior Associate Recruitment या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन नोंदणी (Registration) करावी. ३. आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी. ४. इच्छित राज्य/केंद्रशासित प्रदेश निवडून ऑनलाईन अर्ज शुल्क जमा करावे. ५. अर्ज सादर (Submit) केल्यानंतर फॉर्मची प्रिंट किंवा ‘Confirmation Page’ डाऊनलोड करून जपून ठेवावे.
बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही उत्तम संधी असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:18 14-08-2026














