HSC Result 2026, Konkan Board: बारावीच्या निकालात कोकण विभागाची पुन्हा बाजी! जाणून घ्या सविस्तर निकाल

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (HSC) निकाल आज, २ मे २०२६ रोजी जाहीर झाला आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून मुलींच्या यशाचा टक्का मुलांपेक्षा अधिक आहे.

कोकण विभाग राज्यात नंबर वन!

विभागीय निकालांमध्ये कोकण विभागाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. ९४.१४ टक्के निकालासह कोकण विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. दुसरीकडे, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच ८४.१४ टक्के इतका लागला आहे.

राज्याचा निकाल ८९.७९ टक्के; २ टक्क्यांनी घट

यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या (२०२५) ९१.८८ टक्के निकालाच्या तुलनेत यंदा निकालात सुमारे २.०९ टक्क्यांची घट झाली आहे. राज्यात एकूण १४ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

शाखानिहाय निकाल: विज्ञान शाखा अव्वल

यंदा एकूण १५३ विषयांची परीक्षा पार पडली. शाखानिहाय निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • विज्ञान (Science): ९६.४४ % (राज्यात अव्वल)
  • वाणिज्य (Commerce): ८७.०३ %
  • कला (Arts): ७८.०२ %

मुलींचे यश मुलांपेक्षा सरस

निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे.

  • मुलींचा उत्तीर्ण निकाल: ९३.१५ %
  • मुलांचा उत्तीर्ण निकाल: ८६.८० %

दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन

विद्यार्थ्यांना आपला वैयक्तिक निकाल दुपारी १ वाजल्यापासून खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे:

  1. mahresult.nic.in
  2. hscresult.mkcl.org
  3. hscresult.mahahsscboard.in

निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक? विद्यार्थ्यांनी आपला सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव टाकून निकाल डाऊनलोड करावा. बोर्डाकडून गुणपडताळणी आणि फोटोकॉपीसाठी विशेष सवलत देण्यात आली असून, त्याबाबतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 02-05-2026