लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात शुक्रवारी एका ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रेलरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा ट्रेलर रस्त्याच्या दुभाजकावर (डिवायडर) जाऊन अत्यंत जोरात आदळला. हा अपघात इतका भीषण होता की ट्रेलरच्या पुढील भागाचा (केबिनचा) पूर्णपणे चक्काचूर झाला आणि चालक केबिनमध्येच अडकून पडला होता.
पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल; वाहतूक ठेवली सुरळीत
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक मैदाड, तसेच हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले, एएसआय तळेकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने अंजणारी घाटातील घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रेलर रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर आदळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळित झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेत तात्काळ वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्याचे व ती सुरळीत ठेवण्याचे काम सुरू केले.
अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न; चालकाची सुखरूप सुटका
केबिनचा चक्काचूर झाल्यामुळे चालक आतमध्ये अत्यंत गंभीररीत्या अडकला होता. त्याला बाहेर काढणे पोलिसांसाठी कठीण बनल्याने, चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रत्नागिरी एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तातडीने कटर आणि इतर आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून केबिनचा भाग बाजूला केला आणि चालकाची सुखरूप सुटका केली. चालकाला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर उपस्थित सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 04-07-2026














