खेड: मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून एकाच वेळी तिघांनी उडी मारल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ घडली आहे. या दुर्दैवी आणि आत्मघाती घटनेत एका ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक पुरुष आणि एक दीड वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे नाव शुभ्रा अतिश दिवेकर असे असून, सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हे तिघेही मडगाव-मुंबई मांडवी एक्सप्रेसने प्रवास करत होते.
मुसळधार पावसात साडेसहा वाजता घडला थरार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर खेड तालुक्यातील मेटे गावाच्या हद्दीत घडली. गाडी वेगात धावत असतानाच या तिघांनी अचानक रेल्वेच्या दरवाजातून थेट बाहेर उडी घेतली. कोकणात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसातच हा प्रकार घडल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक परिसरात तात्काळ खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तिघांनाही तातडीने खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुभ्रा दिवेकर यांना तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
आत्मघाती पावलाचे कारण अस्पष्ट; पोलिसांचा सखोल तपास सुरू
या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले सचिन जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षांच्या बालकाची प्रकृती अजूनही चिंताजनक असून, कळंबणी रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. धावत्या रेल्वेतून एवढे मोठे आत्मघाती पाऊल उचलण्यामागे नेमके काय कारण असावे, याचे गूढ अद्याप कायम आहे.
खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. कौटुंबिक वाद, तीव्र मानसिक तणाव किंवा अन्य काही अंतर्गत कारणांमुळे हा धक्कादायक प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत शुभ्रा दिवेकर यांच्या मृतदेहाचे कळंबणी रुग्णालयात शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात येत असून, जखमी सचिन जुवळे शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या जबाबातून नेमकी वस्तुस्थिती समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 04-07-2026














