रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार, दि. ९ मे रोजी जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये येथे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्याकरिता आपले वकील, संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी केले आहे.
लोकन्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक बाद, चेक बाउन्स, दिवाणी वाद, वाद दाखलपूर्व प्रकरणांतर्गत विद्युत कंपनी, बँका, पतसंस्था यांची थकीत कर्जाबाबतची दाखलपूर्व प्रकरणे, तसेच नगरपरिषद, ग्रामपंचायत थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची मामलेदार कोर्टात प्रलंबित वाद अशी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.
नागरिकांनी या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा. मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 08-05-2026














