Train Ticket Rules : रेल्वेच्या तिकीट आरक्षणाच्या नियमात मोठा बदल; 1 नोव्हेंबरपासून नवा नियम लागू

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने एका महत्त्वाच्या नियमात बदल केला आहे. रेल्वे विभागाने हा बदल तिकीट आरक्षणासंदर्भात केला आहे. याआधी तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी 120 दिवस अगोदरच तिकीट बुक करता यायचे.

म्हणजेच तुम्हाला चार महिन्यानंतरच्या प्रवासासाठी अगदोरच रिझर्वेशन करता यायचे. आता मात्र या नियमात बदल करण्यात आला आहे.

प्रवाशांना आता 120 ऐवजी फक्त 60 दिवसांआधी त्यांच्या प्रवासासाठी तिकीट आरक्षित करता येणार आहे. 1 नोव्हेंबरपासून हा नवा नियम लागू झाला आहे.

रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला असला तरी काही विशेष रेल्वेगाड्यांवर या नियमांचा परिणा होणार नाही. ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस या रेल्वेंसाठी आरक्षणाचा हा नियम लागू होणार नाही. यासह परदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांआधीच्या आरक्षणाचा नियम कायम असेल.

रेल्वे विभागाच्या मतानुसार फक्त 13 टक्के प्रवासीच 120 दिवसांआधी त्यांच्या प्रवासासाठी अॅडव्हान्स तिकीट बुक करायचे. जास्तीत जास्त लोक हे 45 दिवसांआधी आपल्या प्रवासाचे तिकीट बुक करतात.

रेल्वे विभागाच्या या नव्या नियमामुळे तिकीट विक्रीतील काळाबाजार रोखला जाईल, असे रेल्वे विभागाने म्हटले आहे. भारतीय रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे. भारतात रेल्वेतून दररोज साधारण 2.4 कोटी प्रवासी प्रवास करतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:08 02-11-2024