कोकणात पर्यटकांची मांदियाळी, पण सीएनजीचा तुटवडा! पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मिरजोळेत कर्मचाऱ्यांना मारहाण

रत्नागिरी: सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने निसर्गरम्य कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. याचबरोबर नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले ‘चाकरमानी’ देखील मोठ्या संख्येने आपापल्या मूळ गावी परतले आहेत. परिणामी, रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील रस्त्यांवर चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, याचा थेट ताण सीएनजी आणि पेट्रोल पंपांवर पडत आहे. इंधनाच्या तुटवड्याच्या अफवेमुळे भर उन्हातही सीएनजी व पेट्रोल भरण्यासाठी वाहनचालकांना लांबच लांब रांगांमध्ये उभे राहून हैराण व्हावे लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पंपांवर प्रचंड गर्दी

मागील दोन दिवसांपासून पंपांवरील गर्दी कमालीची वाढली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत येणारे चाकरमानी तसेच गोव्याला जाणारे पर्यटक यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर येथील सीएनजी पंपांवर चारचाकी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागत आहेत. अनेक पंपांवर सीएनजी संपला तरीही रिफिलिंगच्या गाड्या येईपर्यंत वाहनचालक तासन् तास ताटकळत उभे राहत असल्याचे विदारक चित्र आहे.

स्थानिक रिक्षाचालकांना मोठा फटका

बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि दापोली शहरांमधील स्थानिक रिक्षाचालकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. रिक्षा व्यावसायिकांना आपला व्यवसाय सोडून सीएनजी भरण्यासाठी जास्तीत जास्त वेळ रांगेतच घालवावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन रोजगारावरही मोठा परिणाम होत आहे.

सीएनजी तुटवड्याचे मुख्य कारण काय?

जिल्ह्यात सध्या संगमेश्वर येथील डिंगणी येथेच एकमेव ऑनलाईन पंप उपलब्ध आहे. रिफिलिंगच्या गाड्याही याच ठिकाणी भरल्या जात असल्याने जिल्ह्यातील सर्वच सीएनजी पंपांवरील गाड्यांना या एकाच रिफिलिंग पंपावर अवलंबून राहावे लागत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पंपावरील सीएनजी लवकर संपत आहे आणि परिणामी रिफिलिंग गाड्यांच्या फेऱ्या वाढल्याने वितरणावर ताण येऊन हा तुटवडा निर्माण झाला आहे.

मिरजोळे सीएनजी पंपावर राडा; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सीएनजी पंपावर होणारी गर्दी आणि वाढत्या ताणामुळे वादाच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. गर्दीतूनच झालेल्या किरकोळ कारणावरून रत्नागिरीतील मिरजोळे सीएनजी पंपावरील कामगारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीच्या प्रकारामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, “नवीन कर्मचारी नियुक्ती आणि सुरक्षेचे योग्य नियोजन करूनच पंप पुन्हा सुरू करू,” असे लेखी निवेदन मिरजोळे पंपचालकांनी थेट जिल्हा पुरवठा विभागाला दिले आहे.