Ratnagiri: पर्यटनाच्या हंगामात रत्नागिरीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा! पर्यटकांचे हाल

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात सध्या इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, ऐन पर्यटनाच्या हंगामात वाहनधारकांना आणि पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील सुट्ट्यांमुळे जिल्ह्यात वाहनांची वर्दळ वाढली असतानाच, मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने अनेक पेट्रोल पंपांवरील साठा संपला आहे.

पुरवठा साखळी का विस्कळीत झाली?

रत्नागिरी जिल्ह्याला प्रामुख्याने मिरज आणि हजारवाडी येथील डेपोमधून इंधनाचा पुरवठा होतो. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांकडून जिल्ह्याची दैनंदिन गरज भागवण्यासाठी दररोज साधारण ६० ते ७० टँकर्सची आवश्यकता असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या मुख्य डेपोमधून पुरेसे टँकर उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्याची पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे.

मागणीत १० ते २० टक्क्यांनी वाढ

सध्या लग्नसराई आणि मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. यामुळे इंधनाची मागणी नेहमीपेक्षा १० ते २० टक्क्यांनी वाढली आहे. एकीकडे मागणी वाढत असताना दुसरीकडे पुरवठा घटल्याने “मागणी तसा पुरवठा” हे समीकरण बिघडले आहे. जिल्ह्यातील अनेक पंपांवर ‘पेट्रोल/डिझेल संपले आहे’ असे फलक पाहायला मिळत असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत आहेत.

पर्यटन व्यवसायाला फटका

रत्नागिरीतील पर्यटन व्यवसायावर या इंधन टंचाईचे सावट पसरले आहे. इंधन मिळत नसल्याने अनेक पर्यटकांना त्यांचे पुढचे नियोजन किंवा सफर रद्द करावी लागत आहे. याचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिक, रिक्षाचालक आणि खाजगी ट्रॅव्हल्सवर होत आहे.

वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची भीती

येत्या दोन-तीन दिवसांत मिरज आणि हजारवाडी डेपोतून इंधन पुरवठा पूर्ववत झाला नाही, तर जिल्ह्यातील सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने आणि संबंधित तेल कंपन्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन रत्नागिरीकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 15-05-2026