
वाटद खंडाळा आरोग्य केंद्र दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे’चे निवेदन; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाचारण
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा आरोग्य केंद्र आणि येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सध्या अत्यंत नादुरुस्त आणि धोकादायक बनली आहे. या इमारतीमुळे रुग्ण आणि येथील कर्मचाऱ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत ‘खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थे’चे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैदेही रानडे यांना लेखी निवेदन देऊन हे आरोग्य केंद्र तात्काळ दुसऱ्या सुरक्षित इमारतीत स्थलांतरित करण्याची मागणी केली.
या निवेदनाची मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी तातडीने आणि गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तत्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. आठल्ये यांना आपल्या दालनात बोलावून घेतले. आरोग्य केंद्राची दुरवस्था आणि प्रशासनाचा या विषयातील दुर्लक्षितपणा योग्य नसल्याचे स्पष्ट शब्दांत सुनावत, पुढील दोन दिवसांत या प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या या जलद भूमिकेबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गावणकर यांनी सीईओ रानडे यांचे आभार मानले आहेत.
सन १९८६ मध्ये स्थापन झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राची गेल्या ४० वर्षांत कोणतीही विशेष देखभाल किंवा मोठी दुरुस्ती झालेली नाही. सद्यस्थितीत इमारतीचे पिलर पूर्णपणे नादुरुस्त झाले असून छताचा स्लॅब कधीही कोसळू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात भिंतींमधून पाणी आत येत असून छप्परही उडून गेले आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, विजेच्या वायरिंगमध्ये पावसाचे पाणी जात असल्याने गेल्या दोन वर्षांत काही कर्मचाऱ्यांना विजेचा तीव्र शॉक लागल्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत.
वाटद खंडाळा परिसरात झालेल्या औद्योगिक विकासामुळे (इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट) या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या आरोग्य केंद्रात दररोज १५० हून अधिक ओपीडी (बाह्यरुग्ण), १० हून अधिक आयपीडी (दाखल रुग्ण) आणि महिन्यातून किमान एका प्रसूतीची नोंद होते. एवढा मोठा कार्यभार असतानाही येथे अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीवरील दोन डॉक्टरांपैकी एका डॉक्टरने अनियमित वेतनामुळे कंटाळून राजीनामा दिला आहे. तसेच, येथे एक्स-रे आणि सोनोोग्राफीसारखी कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध नाही आणि औद्योगिक क्षेत्र असूनही तातडीच्या प्रसंगासाठी हक्काची रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा विचारात घेऊन खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेने प्रशासनासमोर दोन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने हे प्राथमिक आरोग्य केंद्र तात्पुरत्या स्वरूपात तातडीने दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित करावे आणि नवीन इमारतीचे काम त्वरित सुरू करावे, ही पहिली मागणी आहे. तर स्थानिक लोकसंख्या लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान अद्ययावत वैद्यकीय यंत्रणा व सोयी-सुविधा तत्परतेने उभ्या कराव्यात, अशी दुसरी मागणी आहे. प्रशासनाने दिलेल्या दोन दिवसांच्या मुदतीत जर योग्य ती कारवाई केली नाही, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी घटनात्मक पद्धतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संस्थेने दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:59 02-07-2026













