Guhagar Goldenman Murder: गुहागरमधील बहुचर्चित ‘गोल्डनमन’ विश्वास खरे खून खटल्याचा निकाल; दोन आरोपींना १२ वर्षांनंतर जन्मठेप

चिपळूण सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; १० तोळे सोन्याच्या चैनसाठी केला होता निर्घृण खून

गुहागर येथील बहुचर्चित ‘Guhagar Goldenman Murder’ खटल्यात अखेर १२ वर्षांनंतर दोन मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चिपळूण येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा. श्री. डी. बी. म्हालटकर यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला. १ ऑक्टोबर २०१४ रोजी गुहागर येथील प्रसिद्ध कासव संरक्षक आणि ‘गोल्डनमन’ म्हणून ओळखले जाणारे विश्वास महादेव खरे यांचा त्यांच्याच होमस्टेमध्ये गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन पर्यटकांनी विळा आणि सुऱ्याने २१ वार करून निर्घृण खून केला होता.

चोरीच्या उद्देशाने पर्यटकांनी केला होता थरारक खून

न्यायालयीन आणि पोलीस नोंदींनुसार, विश्वास महादेव खरे हे गुहागर येथे ‘खरे प्लेझर पॉईंट’ नावाचे होमस्टे चालवत असत आणि ते स्थानिक पातळीवर कासव संरक्षक म्हणूनही सक्रिय होते. १ ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांच्या होमस्टेमध्ये राहण्यासाठी आलेल्या दोन पर्यटक चोरांनी त्यांच्या गळ्यातील १० तोळ्यांची सोन्याची चैन चोरण्याचा कट रचला. चोरांनी विश्वास खरे यांच्यावर विळा आणि सुऱ्याने तब्बल २१ गंभीर जखमा करून, त्यांची मान कापून अत्यंत क्रूरपणे त्यांचा खून केला आणि सोन्याची चैन घेऊन पसार झाले. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२, ३९४ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुणे कनेक्शन: तीन महिन्यांत आरोपींना बेड्या

गुन्हा घडल्यानंतर रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) आणि गुहागर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. घटनेच्या ३ महिन्यांनंतर, जानेवारी २०१५ मध्ये पोलिसांनी शिताफीने तपास करत पुणे परिसरातून तिघांना अटक केली. यामध्ये:

  • आरोपी क्र. १: अमोल चंद्रकांत गाढवे (रा. बोपखेल, पुणे)
  • आरोपी क्र. २: किरण रामदास कुचेकर (रा. उत्तम नगर, पुणे)
  • आरोपी क्र. ३ (माहिती पुरवणारा जोडीदार): विष्णू किसन तनपुरे (रा. दिघी, पुणे)

पोलिसांनी गोळा केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे प्रथम खेड सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते, जे नंतर चिपलूण सत्र न्यायालयात वर्ग झाले.

मुख्य साक्षीदार फितूर होऊनही सरकारी वकिलांचा भक्कम युक्तिवाद

या क्लिष्ट खटल्यामध्ये सरकारी वकील ॲड. प्रफुल्ल रामचंद्र साळवी यांनी सरकार पक्षातर्फे अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत काम पाहिले. त्यांनी न्यायालयात एकूण ५१ साक्षीदार तपासले. खटल्यादरम्यान मुख्य साक्षीदार असलेला सोनार (ज्याला चोरीची चैन विकली होती) आणि अन्य पंच साक्षीदार फितूर झाले होते.

परंतु, सरकारी वकील ॲड. साळवी यांनी त्यांची विस्तृत उलटतपासणी घेतली. मोबाईल टॉवर सीडीआर (CDR) वरून आरोपी घटनेच्या दिवशी गुहागरातच होते आणि नंतर ते पुण्याला गेले, ही बाब त्यांनी न्यायालयात भक्कमपणे सिद्ध केली. या तांत्रिक व परिस्थितीजन्य पुराव्यांमुळे संशयितांनीच हा खून केल्याचा संपूर्ण घटनाक्रम न्यायालयात सिद्ध झाला.

नवनियुक्त न्यायाधीशांनी १२ दिवसांत निकाली काढला १२ वर्षांचा खटला

चिपलूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. डी. बी. म्हालटकर हे महिनाभरापूर्वीच चिपलूण येथे रुजू झाले होते. १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा गंभीर खटला त्यांनी दोन्ही बाजूंचा सलग युक्तिवाद ऐकून घेत अवघ्या १२ दिवसांमध्ये निकाली काढला.

न्यायालयाने आरोपी अमोल चंद्रकांत गाढवे आणि किरण रामदास कुचेकर या दोघांना कलम ३०२ (खून) आणि कलम ३९४ (चोरी) सह ३४ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची तरतूदही करण्यात आली आहे. या निकालानंतर मयताचे भाऊ गोविंद खरे, विवेक खरे आणि पत्नी विद्या खरे यांच्यासह कुटुंबियांनी आपल्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.

तपास पथकाचे विशेष योगदान

या प्रदीर्घ चाललेल्या खटल्याचा तात्कालिन पोलीस निरीक्षक (गुहागर) श्री. विनीत चौधरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. एस. एल. पाटील यांनी सखोल तपास केला होता. तसेच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तराय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी आणि गुहागरचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अंमलदार पो.हवा. श्री. प्रदीप भंडारी व श्री. आशिष शिंदे यांनी साक्षीदारांना वेळेवर न्यायालयात हजर ठेवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 02-07-2026