चिपळूण:
ऐन उन्हाळी सुट्टीत आपल्या बहिणीसोबत मुंबईहून कोकणात गावी येणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेतून तोल जाऊन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना शनिवार, १६ मे २०२६ रोजी दुपारी १२:४० वाजण्याच्या सुमारास चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते बौद्धवाडी येथील रेल्वे पोल क्र. १३०/२० जवळ घडली.
ओंकार विजय गुरव (वय १९ वर्षे, रा. कुर्ला कमानी, मुंबई; मूळ रा. कडवई, ता. संगमेश्वर) असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
चालत्या रेल्वेच्या दरवाज्याजवळून गेला तोल
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार गुरव हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आपल्या बहिणीसोबत मुंबईहून रेल्वेने कोकणातील आपल्या मूळ गावी येत होता. रेल्वे प्रवासादरम्यान दुपारी पाऊणच्या सुमारास गाडी कळंबस्ते परिसरात आली असता, रेल्वेच्या दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या ओंकारचा अचानक तोल गेला. वेगवान धावत्या रेल्वेतून तो थेट खाली कोसळला. रेल्वे ट्रॅक शेजारील पोलजवळ पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच प्राण गेला.
बहिणीसमोरच भावाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गुरव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चिपळूण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
या अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.
रेल्वे प्रवासादरम्यान दरवाज्यात उभे राहणे किंवा प्रवास करणे किती धोकादायक ठरू शकते, हेच या दुर्दैवी घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:46 18-05-2026














