रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील कुवारबाव रस्त्यावरील उतारावर डंपर आणि मारुती कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये कारमधील एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवार, १६ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.
मूळ गावाहून परतताना काळाचा घाला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेंद्र दत्ताराम कांबळे (वय ३९, रा. एसटी कॉलनी, रत्नागिरी) हे आपली दोन मुले आदित्य आणि सलोनी यांच्यासह कारने (क्रमांक: MH 08 AX 5204) शुक्रवारी (१५ मे) चिपळूण तालुक्यातील नांदगाव या आपल्या मूळ गावी गेले होते.
शनिवारी रात्री गावाहून रत्नागिरीत परतत असताना, कुवारबाव रस्त्यावरील उतारावर समोरून येणाऱ्या एका भरधाव डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचे मोठे नुकसान झाले असून शैलेंद्र कांबळे यांच्यासह त्यांची दोन्ही मुले जखमी झाली.
डंपर चालक फरार; शहर पोलिसांत गुन्हा नोंद
अपघात घडल्यानंतर अपघातग्रस्त प्रवाशांना मदत करण्याऐवजी डंपर चालकाने आपली गाडी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. जखमी झालेल्या तिघांनाही तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलीस चौकीत अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. फरार डंपर चालकाचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार पुढील अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 18-05-2026














