Ratnagiri: ‘जीवन प्राधिकरण’च्या निवृत्तीधारकांची पेन्शन अखेर जमा

रत्नागिरी:– महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून रखडल्याने निवृत्तीधारक मेटाकुटीस आले होते. विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून पेन्शनबाबत कोणतीच माहिती निवृत्तीधारकांना मिळत नसल्याने यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. दोन महिन्याची रखडलेली पेन्शन अखेर गुरुवारी (21 मे ) सायंकाळी निवृत्तीधारकांच्या बँक खात्यात जमा झाली. आणि पेन्शनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

एमजीपी विभागातील निवृत्ती धारकांची गेल्या दोन महिन्यांपासून पेन्शन रखडली होती. वयोमानानुसार व्यक्तींना विविध आजारांचा सामना करावा लागतो. मात्र पेन्शनच वेळेत न आल्याने निवृत्तीधारक हवालदिल झाले होते. अनेक निवृत्तीधारकांना त्यांची नियमित औषधे विकत घेताना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. पेन्शन वेळेत न झाल्याने निवृत्तीधारकांना शारीरिक तसेच मानसिक त्रास देखील मोठा सहन करावा लागला. वारंवार विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र रत्नागिरीतील पेन्शनधारकांना कोणतीच समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती, असे येथील निवृत्तीधारकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे अखेरचा मार्ग म्हणून पुढच्या काही दिवसात संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय या संतप्त पेन्शनधारकांनी घेतला होता. आता हे आंदोलन होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमजीपी विभागातील निवृत्ती धारकांची पेन्शन इतके दिवस का रखडली?असा प्रश्न निवृत्ती धारकांमधून विचारला जात आहे. यासाठी कोण जबाबदार आहे त्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी पेन्शनधारकांमधून होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील निवृत्तीधारकांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी पेन्शनधारकांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 25-05-2026

Arihant 4