राज्यात ५३,८६२ शिबिरांचे आयोजन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उपक्रम यशस्वी
Shree Ganesha Aarogyacha Scheme : गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना त्यांच्या घराच्या परिसरातच मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानांतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये तब्बल ५३ हजार ८६२ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
विविध गंभीर आजारांचे वेळेत निदान आणि उपचार मार्गदर्शन
भाविकांना आरोग्य तपासणीसाठी लांब जावे लागू नये आणि गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने गणेशोत्सवाच्या मंडपांपासून ते ग्रामीण भागापर्यंत ही शिबिरे आयोजित केली गेली.

तपासणी केलेले आजार: शिबिरांमध्ये हृदयरोग, कर्करोग, किडनीविकार, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे आजार आणि बालरोग यांसारख्या विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
पुढील उपचार व योजना: आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या ५ हजार ९९३ संदर्भित रुग्णांना (Referred Patients) पुढील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे व रुग्णालयांत पाठवण्यात आले. तसेच पात्र रुग्णांना ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ व इतर शासकीय योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले.
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाची विभागनिहाय आकडेवारी
राज्यातील सर्व विभागांमध्ये या शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला:
पश्चिम महाराष्ट्र: १२,४२४ शिबिरांमध्ये सर्वाधिक ७,६६,७६२ भाविकांची तपासणी.
विदर्भ: ९,८३४ शिबिरांमध्ये ५,९४,६३६ नागरिकांची आरोग्य तपासणी.
मराठवाडा: ७,६३१ शिबिरांत ४,५६,८६३ नागरिकांची तपासणी.
उत्तर महाराष्ट्र: ५,८३८ शिबिरांमध्ये २,८८,९४० भाविकांची तपासणी.
ठाणे-पालघर भाग: ६,०१७ शिबिरांमध्ये ३,००,१७० नागरिकांची तपासणी.
कोकण विभाग: ३,२४९ शिबिरांमध्ये १,३७,१४८ भाविकांची आरोग्य तपासणी.
सलग दुसऱ्या वर्षी उपक्रमाला उत्तम प्रतिसाद : रामेश्वर नाईक
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी या उपक्रमाच्या यशाबद्दल माहिती देताना सांगितले की, "सलग दुसऱ्या वर्षी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. विविध शासकीय यंत्रणा, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या एकत्रित सहकार्यामुळेच २९ लाखांपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत मोफत आरोग्य सेवा पोहोचवणे शक्य झाले."













